चंद्रपूर : उन्हाळय़ाला सुरुवात होताच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात व्याघ्र भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना काळा बिबट दर्शन देत आहे. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच कोळसा वनपरिक्षेत्रात पर्यटकांना काळा बिबट दिसल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

हिवाळय़ाची थंडी संपून मार्च महिन्यात उन्हाळय़ाला सुरुवात होताच हमखास व्याघ्र दर्शन होते. याच काळात पर्यटकांची ताडोबा प्रकल्पात गर्दी होते. देशविदेशातील असंख्य पर्यटक केवळ वाघोबाच्या दर्शनासाठी प्रकल्पात येतात. काल रविवारी ताडोबात नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. मोहुर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात सकाळ आणि दुपारच्या फेरीत प्रकल्प हाऊसफुल्ल  झाला होता. याचवेळी कोळसा वनपरिक्षेत्रात पर्यटकांची सफारी सुरू असतानाच काळय़ा बिबटय़ाने दर्शन दिले. जिप्सीतून व्याघ्र भ्रमंती सुरू असताना अचानक हा काळा बिबट पर्यटकांच्या समोर येऊन उभा राहताच सर्वानाच धक्का बसला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही उन्हाळय़ात काळय़ा बिबटय़ाने दर्शन दिले होते. त्यानंतर काळय़ा बिबटय़ाला बघण्यासाठी असंख्य पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र त्यानंतर अचानक बिबटय़ाने पर्यटकांना दर्शन देणे बंद केले. दरम्यान, आता यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा एकदा उन्हाळय़ाची चाहूल लागताच बिबट जंगलातून बाहेर पडला आहे. काळय़ा बिबटय़ाच्या दर्शनाने पर्यटक सुखावले आहेत.

 

 

Story img Loader