तानाजी काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नष्टप्राय श्रेणीतील पक्ष्यांच्या यादीत समावेश असलेले ‘इजिप्शियन गिधाड’ इंदापूर तालुक्यातील भिगवण-कळस भागाच्या गवताळ प्रदेशात हौशी पक्षी निरीक्षकांना आढळून आले आहे. गिधाडांच्या अनेक जाती, प्रजाती नष्टप्राय श्रेणीत जात असताना हे गिधाड आढळल्याने इंदापूर तालुक्यातील पक्षी जगतात एका दुर्मीळ पक्ष्यांची नोंद झाली  आहे.

इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयालगत यंदा नेपाळी गरुडांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे अनुमान, पक्षिनिरीक्षकांकडून व्यक्त होत असून  उजनी धरणाच्या पाणवठय़ावरून पक्षिनिरीक्षकांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण, कळस, पळसदेव परिसरातील गवताळ प्रदेशात पक्षी निरीक्षणासाठी आपला मोर्चा वळवला आहे. अनेक कारणांनी गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हे गिधाड मेलेल्या प्राण्यांचे मांस व हाडाच्या आतील भाग खात असल्याने, निसर्गातील स्वच्छतादूत म्हणून त्यांचे निसर्ग साखळीत महत्त्वाचे स्थान मानले जाते. १९८५ च्या पूर्वी महाराष्ट्रात विविध जातींच्या गिधाडांची संख्या लक्षणीय होती. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांना दिलेल्या काही औषधांच्या प्रभावामुळे औषधांचा वापर करण्यात आलेले जनावरे मृत पावल्यानंतर त्यांचे मांस गिधाडांनी खाल्लय़ास गिधाडे मृत्युमुखी पडतात. याच कारणामुळे भारतात गिधाडांची संख्या कमी झाली असल्याचे अनुमान व्यक्त होत आहे.

इजिप्शियन गिधाडाला पांढरे गिधाड म्हणूनही ओळखतात. आकाराने जरा लहान असलेल्या गिधाडाचे डोके पिसेविरहित व पिवळसर आहेत. उड्डाण पिसे काळसर, लांबट व टोकदार असतात. ही जात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे अनुमान वर्तवण्यात येत आहे. सौंदर्याने कुरूप असलेला हा पक्षी मृतकभक्षक असल्यामुळे सामाजिक स्तरावर उपेक्षितच राहिला. आता तर त्याचा नष्टप्राय होत असलेल्या पक्ष्यांच्या यादीत  समावेश झाला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील तीन-चार वर्षांमध्ये इजिप्शियन गिधाड हा पक्षी तुरळक प्रमाणामध्ये आढळून आला होता. उजनी धरणाच्या परिसरात पुणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला इंदापूर तालुक्यात तो यापूर्वी कधी दिसला नाही. परंतु या वर्षी उजनी जलाशयाच्या प्रदेशात त्याचे आगमन झाले आहे. उजनी पाणवठय़ावरील पक्षी पाहण्याबरोबरच आता इंदापूर तालुक्यातील गवताळ प्रदेशातही पक्षिनिरीक्षण करण्याचा आनंद मिळेल. मात्र आपल्याकडील थंडी संपताच या पक्षाचे पुन्हा अन्यत्र स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

– अजिंक्य घोगरे, पक्षिमित्र