वाई: पाचगणी येथे संजीवन विद्यालय परिसरात सर्पमित्र व मुख्याध्यापक धनंजय शिरूर यांना दुर्मिळ असा ‘पोवळा साप’ आढळून आला.या सापाचे शास्त्रीय नाव Calliophis beddomei Smith आहे. याला हिंदीमध्ये ‘मुंगा साप’ असेही म्हणतात.साप भारतीय प्रजातीचा असून डोंगराळ प्रदेशात आढळतो.या सापाला सुरक्षित निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आलेला आहे.

पाचगणीचे संजीवन विद्यालय या निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा परीसर डोंगराळ भागात असून खूप मोठा आहे.या परिसरात असंख्य दुर्मिळ झाडे झुडपे वेली वनस्पती आहेत.या विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्पमित्र धनंजय शिरूर यांना दुर्मिळ असा ‘पोवळा साप’ आढळून आला.हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ आहे. अतिशय सुंदर व दोन ते अडीच फूट लांबीचा हा साप पालापाचोळा खाली व जमिनीखाली राहतो. या सापाचे खाद्य पाली व इतर छोटे साप व कीटक आहे. या सापाचे डोळे अतिशय बारीक असतात व त्याचा चेहरा मानेपेक्षा मोठा असतो. हा साप भारतीय प्रजातीचा असून पश्चिम घाट केरळ, तामिळनाडू, मुन्नार, निलगिरी, अन्नमलाई, द्रावण कोर, शेबाराय चे डोंगर, महाराष्ट्रात पाचगणी, महाबळेश्वर,आंबोली, सिंहगड, खंडाळा,भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. हा डोंगराळ प्रदेशात आढळणारा साप असून ६५६० फूट च्या उंचीपर्यंत हे आढळू शकतो.

हेही वाचा >>>सांगली : शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ, विरोधकांची समांतर सभा

पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो हा साप काळसर रंगाचा असून पोटाखाली भगव्या रंगाचा आहे. भगवा गडद रंग हा तो जहाल विषारी असल्याच्या धोतक मानले जाते. याच्या शेपटी जवळ खालच्या बाजूला पांढरा रंग आहे. याला राग आल्यास शेपटी उंचावून गोलाकार करून माझ्याजवळ येऊ नका असे संबोधित करतो. हा साप विषारी आहे पण याला विषारी सापासारखे दोन मोठे दात नसतात. या सापाच्या चावण्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेला आहे अशी नोंद नाही. हा साप पाहणे म्हणजे सर्प मित्रांसाठी व अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे. या सापाचे विविध प्रकार पश्चिम घाटात आढळतात. ह्या सापाला सुरक्षित निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आलेला आहे. अशा दुर्मिळ प्राण्यांच्या, वनस्पतींच्या संवर्धनासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे व निसर्ग समृद्ध केला पाहिजे असे सर्पमित्र धनंजय शिरूर यांनी सांगितले.

(पियुष शहा ,पाचगणी)

Story img Loader