भुसावळ : विविध प्रकारच्या वनसंपदेने नटलेल्या सातपुडा पर्वतराजीत ‘कॉल्मनार बेसॉल्ट’ (बेसॉल्ट अश्मखांब) प्रकारातील दुर्मीळ खडक यावल अभयारण्य आणि पाल परिसरातील नदीपात्रात ते आढळले.
पर्यावरण अभ्यासक तथा केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी संशोधनातून ही बाब उघड के ली. त्यांनी वन्यजीव संरक्षक संस्थेचे रवींद्र फालक, नितीन जोशी यांच्यासमवेत पाल, जामन्या, करंजपाणी, लंगडाआंबा, वाकी, गारखेडा आणि शिरवेल आदी परिसराचा दौरा केला. रावेर तालुक्यात पाल या गावाजवळील सुकी नदीत वन विभागाच्या विश्रामगृहालगत १०० मीटर परिसरात कॉल्मनार बेसॉल्ट (दगडी खांब) सापडले. सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातील लाव्हारसातून तयार झालेले कॉल्मनार बेसॉल्ट नावाचे हे खडक आहेत. लाव्हारस अचानक पाण्याच्या संपर्कात येऊन थंड झाल्यास आकुंचित पावून षटकोनी आकाराचे खांब तयार होतात, अशी माहिती अभ्यासक प्रा. चोपणे यांनी दिली. जळगाव जिल्द्यातील परिसर हा भौगोलिकदृष्टय़ा अतिप्राचीन आहे. महाराष्ट्रात ८० टक्के भूभाग याच बेसॉल्ट अग्निज खडकापासून बनला आहे. पुढे भूभागाच्या अंतर्गत घडामोडींमुळे जमीन उंच होत गेली आणि सातपुडा पर्वतरांग तयार झाली.
कर्नाटकातील सेंट मेरी बेट अशाच कॉल्मनार बेसॉल्टसाठी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यात मुंबई, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ येथे हे खडक आढळले असून त्यात जळगाव जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात बेसॉल्ट खडकाची जाडी जास्त असते. विदर्भात ती कमी आहे. हजारो वर्षांपासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत आहेत. यातून अनेक जीवाश्मांचे संशोधन होऊ शकेल.
कित्येक कोटी वर्षांपूर्वी या परिसरात लाव्हारस वाहत आल्यानंतर तो येथील नद्यांमध्ये पडून अचानक थंड झाला असावा. नंतर तो आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले. इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे हे खांब होऊ शकले नाहीत. अनेक ठिकाणी षटकोनी खांबांऐवजी पंच किंवा सप्तकोनी खांबही आढळतात. हे खांब मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी तयार केले होते की काय, असेच दिसतात. त्यामुळे मानवनिर्मित, ऐतिहासिक खांब असल्याची गल्लतही होते, याकडे प्रा. चोपणे यांनी लक्ष वेधले.