रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे. या वृक्षाला भारतामध्ये गोरख चिंचेचे झाड म्हणून ओळखले जाते. हे वृक्ष आढळल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून तात्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनदृष्ट्या ‘हेरिटेज ट्री’चा वापर करून तेथे उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच खासगी कंपनीच्या सीआरपीएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येईल. या झाडाचे महत्व काय, झाड किती वर्षांपूर्वीचे आहे ही माहिती देखील तिथे लावली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाओबाब म्हणजेच गोरख चिंच मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वृक्ष आहे. याच्या ९ प्रजातींपैकी ६ प्रजाती केवळ मादागास्करमध्ये आढळतात. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होते. हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो.

“या झाडाच्या खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता”

फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात. खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशात सुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. खोड पोकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.

या झाडाला गोरखचिंच म्हणण्यामागील आख्यायिका काय?

महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात. गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले अशी आख्यायिका आहे. गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले, म्हणून या वृक्षाला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते. याच्या बाओबाब या आफ्रिकन नावाचा अर्थ ज्येष्ठवर्य असा आहे.

झाडाला साधारण १.५ किलो वजनाचं मखमली साल असलेलं फळ

या झाडाच्या फळाची साल मखमली असून वजन साधारण १.५ किलो असते. गोरखचिंचेच्या पानांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात. गरापासून शीत पेय करतात. गराचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यावर या पेयाचा उपयोग होतो. जंगली प्राणी याची पाने आवडीने खातात. माणसे खोडाचे तुकडे चघळून शोष कमी करतात.

हेही वाचा : “बाबांनो, ‘हे’ करायला अक्कल लागते”, नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा हल्लाबोल

खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. फळाच्या वाळलेल्या करवंट्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. लाकूड हलके असते. त्यामुळे गुजरातमध्ये याच्या लाकडापासून मासेमारीसाठी होड्या तयार केल्या जातात. अंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो. या वृक्षावर सुगरणीसारखे पक्षी घरटी करतात.

रत्नागिरीतील झाडाच्या वयावरून दोन मतं

असं असलं तरी रत्नागिरीतील या बाओबाब म्हणजेच गोरखचिंचेच्या झाडाच्या वयावरून दोन मतं आहेत. वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ. शरद आपटे म्हणाले, “हे झाड फारतर १०० किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वर्षांचं असेल. अशी झाडं पुण्यात निगडी प्राधिकरण येथे आहेत. पालशेतजवळ एक फार मोठे गोरखचिंचेचं झाड आहे. त्याचा बुंध्याचा घेर जवळजवळ १८ ते २० फूट आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare tree baobab from africa of 400 year old found in ratnagiri pbs