पुणे व सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवरील उजनी धरणाच्या जलाशयाचे पाणी घातक रासायनिक घटकांसह प्रचंड प्रदूषित झाल्याने या जलाशयातील नैसर्गिक जैववैविध्ये व पाणवनस्पतीसह जलचर प्राण्यांना मोठा धोका निर्माण झाला असून गेल्या दशकात या पाण्यात आढळून आलेल्या दुर्मीळ पाणवनस्पती नामशेष झाल्या आहेत.
या वनस्पतींचे जतन व संवर्धन करण्यासाठी वेळीच दखल न घेतल्यास या पाणवनस्पती उजनी जलाशयातून कायमची हद्दपार होणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या कारखानदारीचे सांडपाणी व रासायनिक पदार्थ उजनी जलाशयात मोठय़ा प्रमाणात येतात. विविध कारणांमुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू शकत नसल्याने प्रदूषित घटक तिथेच अडकून पडतात. उजनीच्या पाण्याची पातळी सध्या कमालीची घटली आहे. सातत्याने रासायनिक पदार्थाच्या सान्निध्यात उजनीतील पाणवनस्पती व जैववैविध्य असलेल्या या पदार्थाच्या प्रभावामुळे पाणवनस्पती नष्ट होत असल्याचे अनुमान अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. घटत्या पाण्याच्या पातळीबरोबर या वनस्पती उघडय़ा पडत असल्यानेही त्या नष्ट पावतात, तसेच या धरणात मासेमारी मोठय़ा प्रमाणात चालत असल्याने मासे पकडताना पाणवनस्पती जाळ्यात अडकून मच्छीमारांकडून त्या पाण्याबाहेर फेकल्या जातात.
उजनीच्या पाण्यात असलेल्या पाणवनस्पतीत जीवजंतू, किडे, छोटे मासे, शंख, शिंपले हे रोहित (फ्लेमिंगो) या स्थलांतरित पक्ष्यांचे खाद्य असते. मात्र अतिप्रदूषित पाणी, वारंवारचा दुष्काळ यामुळे हे पक्षी उजनीकडे पाठ फिरवण्याच्या धोका असून या वर्षी तर चित्रबलाक पक्षी उजनीकडे फिरकलेच नाहीत.
दहा वर्षांपूर्वी भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे विभागाचे पथक उजनी जलाशयाच्या भागात पाणवनस्पतींच्या सर्वेक्षणासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी करमाळा व इंदापूर तालुक्याच्या परिसरात उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणवनस्पतींची पाहणी केली. त्या वेळी त्यांना अनेक दुर्मीळ जातीच्या पाणवनस्पती कमी झाल्याचे आढळून आले. केवळ पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात त्यांना ‘पिस्टिया’ ही पाणवनस्पती आढळली होती. आज तीही दिसत नाही. याशिवाय ओट्टेलिया, इकॉरिया, हायड्रिला, लेम्ना, लुडुव्हिजिया, सीरॅटोफायलम आदी दुर्मीळ पाणवनस्पतींचे प्रमाण दहा वर्षांपूर्वीच घटले होते. त्या आता उजनी धरणातून जवळजवळ नामशेष झाल्या आहेत.
वैशिष्टय़पूर्ण लाजाळू दिसेना
इंदापूर तालुक्यात पठारी भागात कायम आढळणारी व आबालवृद्धांचे लक्ष वेधणारी ‘लाजाळू’ ही वनस्पतीही आता नामशेष झाली आहे. हाताचा स्पर्श होताच आपली पाने पटापट मिटवून घेणारी वैशिष्टय़पूर्ण वनस्पती आज विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीसुद्धा सापडत नाही. त्याचबरोबर कडवंची, पात्रा, अंबाडी या रानभाज्याही हद्दपार झाल्या आहेत. १९५२ व ७२ च्या दुष्काळात अन्नधान्य टंचाईमुळे या भाज्या खाऊन एक एक दिवस ढकलल्याचे हा दुष्काळ पाहिलेले, अनुभवलेले शेतकरी आजही दुष्काळाच्या आठवणी सांगताना या रानभाज्यांचे महत्त्व सांगतात.