* शुल्क कमी करण्याची मागणी * शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचची साथ
शहरातील रासबिहारी स्कूलने शासनाची मान्यता न घेता एप्रिल २०१२ मध्ये केलेली प्रचंड शुल्कवाढ शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर वार्षिक पाच हजार रुपयांनी कमी करण्यात आली असली तरी पालक व मंच हे अजून शुल्क कमी करावे यावर ठाम आहेत. या मागणीसाठी शनिवारी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चासाठी सर्व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रासबिहारी पालक संघ व शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
२०११-१२ मध्ये वार्षिक २२,८०० असणारे शुल्क शाळेने ३७,२०० रुपयांपर्यंत नेले होते. अलीकडेच शिक्षण उपसंचालकांनी हे शुल्क ३२ हजार २२५ पर्यंत कमी करण्याचा निर्णय दिला. शाळेने केलेल्या शुल्क वाढीला शासनाकडून मान्यता घेण्यात आलेली नव्हती. या विरोधात पालकांनी एप्रिल २०१२ पासून शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले होते. शुल्क प्रस्तावाची पडताळणी करताना कार्यालयातील लेखाधिकाऱ्यांकडून लेखा परीक्षण करून घेऊन शुल्क मान्यतेबाबत निर्णय घेण्यात यावा असे सुचविले होते. या अहवालावर कारवाई करत विभागीय उपसंचालक कार्यालयातील कार्यबळ गटामार्फत शाळेच्या शुल्क प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळेचे वार्षिक शुल्क ३७ हजार २०० ऐवजी ३२ हजार २२५ रुपये एवढे मंजूर करण्यात आले. रासबिहारी शाळेनेही शुल्क पाच हजार रुपयांनी कमी करण्यास तयारी दर्शविली. मात्र, हे शुल्क अजून कमी होणे आवश्यक असल्याची पालक व शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचची मागणी आहे. या मागणीसाठी शनिवारी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढण्यात येणार असून शहरातील ज्या शाळांनी विना परवानगी शुल्क वाढ केली आहे, अशा शाळांच्या सर्व पालकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा