महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या सायबर सेलनं जितेन गजारिया यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले आहेत. या ट्वीटवरुन आता सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवली असून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. या ट्वीटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. आता या ट्वीटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता याबद्दल पोलीस चौकशी करत असून गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
जितेन गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जितेन गजारिया हे या प्रकरणात जर दोषी आढळले तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याच प्रकरणाबद्दल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. या प्रकरणाबद्दल त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, आक्षेपार्ह भाषेचं समर्थन कोणीही करणार नाही. पण हे उपमुख्यमंत्री भरसभेत बोलले. शिवाय इतर नेतेही महिलांचा उपमर्द करणारी वक्तव्यं करत आहेत. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार महिलेबद्दल भरसभेत वापरलेली भाषा आक्षेपार्ह नव्हती का? अजूनही गुलाबराव पाटलांवर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई का केली नाही? कायदा सर्वांना सारखाच…महिला खासदारांवर शिवसेनामंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह नव्हतं का? शिवसेना खासदार सर्वज्ञानींनी भाजपा नेत्यांना प्रसिद्धी माध्यमांसमोर केलेली शिवीगाळ आक्षेपार्ह नव्हती? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे करत आहे.