या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या पडद्याआड राजकारण करतात किंवा पक्षांसंबधी निर्णय घेतात, असं सातत्याने म्हटलं जातं. रश्मी ठाकरे या लाईमलाईटपासून दूर राहत असल्या तरीही शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव असतो असंही म्हटलं जातं. यावर आदित्य ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते बोल भिडूने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

शिवसेनेच्या राजकारणावर तुमच्या आईंचा म्हणजेच रश्मी ठाकरेंचा प्रभाव आहे अशी टीका होत असते, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “हे बरोबर उलटं घडतं घरी. आई नेहमी सांगत असते की तुला का राजकारणात यायचंय, का निवडणूक लढवायची आहे वगैरे. आई तशी मागे राहते. तिची इमेज या लोकांनी बनवली आहे की रश्मी ठाकरेंनी हे सांगितलं, रश्मी ठाकरेंनी ते सांगितलं. पण आई एकदम उलटी आहे. ती घरी आम्हाला नेहमी जमिनीवर राहायला सांगत असते.”

हेही वाचा >> लोकांनीच निवडणूक हातात घेतली : पृथ्वीराज चव्हाण

जे सोबत राहतात तेच परिवार

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांव्यतिरिक्त संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांबरोबर राहिलं. पण संपूर्ण ठाकरे कुटुंब आज महायुतीत आहे. ठाकरे गटाबरोबर कोणीही नाही, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “आता या गोष्टीला १५-१६ वर्षे झालीत. आमचं कुटुंब फार मोठं आहे. आमच्या बरोबर जे राहिलेत ते आमचा परिवारच आम्ही समजतो. जे कोणी गेले त्यांनाही आम्ही काका वगैरेच बोलत होतो. जे सोबत राहतात तेच परिवार आहेत. तेच घेऊन चालायचं हेच आम्हाला शिकवलं आहे.”

हेही वाचा >> अरविंद सावंत यांचा राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “रंग बदलणारा सरडा…”

शरद पवारांवर अविश्वास दाखवणं चुकीचं

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार भाजपाबरोबर जातील, अशी चर्चा आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी पवारांना गेले ५ वर्षे जवळून ओळखतो. मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. या वयात त्यांची मी जिद्द पाहिली आहे. ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांना पावसात उभं राहून भिजून निवडून आणलं ते आता त्यांना सोडून गेले. त्यांची मनस्थिती काय असेल? त्यांनाच सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी हा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला. अहिल्यानगरच्या सभेत पावणेतीन तासांचा रोड शो झाला. त्यांच्यात उत्साह आणि जोश होता. पवार आमच्या जीपमध्ये बसले होते. दोन तास पूर्णपणे फेरफटका मारला. त्यानंतर सभेत येऊन संबोधित केलं. ती सभा त्यांनी पूर्ण केली. ५२ सभा ते घेत आहेत. आतापर्यंत ४६ सभा झाल्या. या वयात ते लढत असतील तर त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi thackerays influence in thackerays political decision aditya thackeray said sgk
Show comments