महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीपर्वाला वादाचे ग्रहण
प्रशांत देशमुख, वर्धा</strong>
महात्माजींच्या विचाराने प्रेरित होऊन असंख्य रचनात्मक संस्थांचे जाळे वर्धा व परिसरात उभे झाले. सेवाग्रामला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने वाद उफाळला होता. आता अ. भा. राष्ट्रभाषा प्रचार समितीचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.
महात्माजींनी १९३६ साली या संस्थेची स्थापना सेवाग्राम आश्रमात केली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, जमनालाल बजाज असे नामवंत राष्ट्रीय पुढारी या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. संपूर्ण भारतात राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा प्रचार करण्याचा या संस्थेचा मुख्य हेतू आहे. विविध भारतीय भाषांत समन्वय साधण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.
भारतभरात शाखा आहेच. अमेरिकेसह २० देशांत संस्थेचे कार्य आजही सुरू आहे. याच संस्थेच्या प्रचारातून पुढे वध्र्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन झाले. अशी महान परंपरा असलेल्या या संस्थेचा ताबा घेण्याबाबत दोन गट पडले.
नवनियुक्त सचिव प्रा. त्रिपाठी यांनी दोन दिवसांपूर्वी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. मात्र त्यावर चौधरी गटाने आक्षेप घेतला. जबरदस्तीने ताबा घेतल्याची तक्रार चौधरी गटाने पोलिसांकडे केली. तर निवडणूक व अन्य कार्यात हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार त्रिपाठी गटाने केली आहे. प्रा. अनंतराव त्रिपाठी यांनी आरोप फेटाळून लावत कायदेशीर प्रक्रियेनुसार पदभार स्वीकारल्याचे नमूद केले. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही झाली आहे. सूर्यवंशी चौधरी यांनी त्रिपाठी गटाने कार्यालयावर जबरीने ताबा घेतल्याचा आरोप केला. त्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत. माझ्या अनुपस्थितीत ते पदभार घेऊच शकत नाहीत असे म्हणणे आहे.
नेमका वाद काय?
दोन्ही गट परस्परांविरोधात तक्रारी करीत पोलिसांकडे पोहोचले आहे. या संस्थेतील शिष्यवृत्ती घोटाळ्याचे निमित्त होऊन गटबाजी वाढली. पुढे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी घेतलेल्या निवडणुकीत प्रा. अनंतराव त्रिपाठी यांचा गट विजयी झाला, तर अध्यक्ष सूर्यवंशी चौधरींचा गट पराभूत झाला. प्रा. त्रिपाठी हे अनेक वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत आहेत.