संजीव कुळकर्णी
नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मूळ गावी त्यांच्या अर्धाकृती पुतळय़ाची दुरवस्था झाली आहे. कंदकुर्ती गावातील हा अर्धाकृती पुतळा अडगळीत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील कंदकुर्ती (ता. बोधन) हे छोटेसे गाव डॉ. हेडगेवार यांचे जन्मगाव. सध्या हेडगेवार कुटुंबातील कोणाचेही या गावात वास्तव्य नाही. नांदेड जिल्ह्यातील बिलोलीचे माजी आमदार गंगाधर पटने हे काही दिवसांपूर्वी आपल्या भगिनीला भेटण्यासाठी कंदकुर्ती येथे गेले, त्यावेळी त्यांना एका बोअरजवळ झाडाझुडपांत हेडगेवार यांचा उघडय़ावर ठेवलेला पुतळा आढळून आला. पटने यांनी आपल्या सहकाऱ्याकडून त्याचे छायाचित्र काढून घेतले.

डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या देशव्यापी विशाल संघटनेचे शताब्दी वर्ष येत्या विजयादशमीपासून सुरू होईल. संघाचे मुख्यालय नागपूरला असून, तेथे डॉक्टरांबद्दलचा भक्तिभाव दररोज व्यक्त होत असला, तरी संघप्रमुखांच्या पुतळय़ाची त्यांच्या मूळ गावातील दुर्दशा पाहून आपल्याला धक्का बसल्याचे पटने यांनी नमूद केले. 

हेही वाचा >>>घरफोडी-लुटमारीत सर्वाधिक बालगुन्हेगार; महाराष्ट्र पहिल्या तर तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर

कंदकुर्ती हे गाव तेलंगणा राज्याच्या बोधन विधानसभा मतदारसंघात आहे. राज्यनिर्मितीपासून तिथे भाजपला यश मिळालेले नाही. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादपासून हे गाव जेमतेम १० किमी अंतरावर असून, कंदकुर्तीवासीयांसाठी धर्माबाद हेच जवळचे रेल्वेस्थानक आहे. डॉ. हेडगेवार यांचा अर्धाकृती पुतळा उघडय़ावर आणि असुरक्षित जागी कसा आला, ते पटने यांना ठाऊक नाही. नांदेड जिल्ह्यातील संघाचे प्रमुख पदाधिकारी, तसेच धर्माबादचे प्रमुख कार्यकर्ते याबाबतीत अनभिज्ञ आहेत. या गावातील यादवराव या वयोवृद्ध गृहस्थाकडे चौकशी केली असता, मागील अनेक वर्षांपासून हेडगेवार यांचा पुतळा ज्या वास्तूत विराजमान होता, ती वास्तू अलीकडे पाडण्यात आली. तत्पूर्वी तेथील पुतळा बाहेर आणून ठेवला गेला असे समजले. पाडण्यात आलेल्या वास्तूच्या जागी नवे बांधकाम प्रस्तावित आहे, पण ते कोण करणार याबद्दल नांदेडच्या संघ पदाधिकाऱ्यांकडे माहिती नाही. 

यादवराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचे एक मोठे पदाधिकारी भैय्याजी जोशी नोव्हेंबर महिन्यात कंदकुर्ती येथे आले होते. त्यानंतर २ डिसेंबर रोजी कंदकुर्ती येथे डॉ. केशव बळिराम हेडगेवार स्मृती मंदिर बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन भुवनेश्वरी पीठाधिपती कमलानंदा भारती स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. याला जोडूनच तिथे निवासी शाळा आणि युवकांसाठी कौशल्यविकास संस्था स्थापन केली जाणार आहे. पण नंतर संघाकडून तिथे कोणीही फिरकले नाही. पटने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात वरील गावात गेले तेव्हा त्यांना संघ संस्थापकांचा पुतळा उघडय़ावर पडल्याचे दृश्य दिसले.

हेही वाचा >>>वंदे भारत रेल्वेची गती वाढविणार; मराठवाडय़ातील औद्योगिक क्षेत्रास फायदा- फडणवीस

१० वर्षांपासून उपेक्षा

’कंदकुर्ती हे गाव देशभर डॉ. हेडगेवार यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. गोदावरी, मांजरा, हरिद्रा या तीन नद्यांचा संगम या गावाजवळ होतो.

’गावात प्राचीन राम मंदिर आहे. हेडगेवार यांचा या गावाशी असलेला संबंध लक्षात घेऊन निजामाबादच्या तत्कालीन खासदार के. कविता यांनी हे गाव दत्तक घेतले होते.

’भाजपच्या मागील १० वर्षांच्या राजवटीत या गावाची उपेक्षाच झाल्याचे सांगण्यात येते. संघ संस्कार किंवा मूल्यांच्या कोणत्याही खाणाखुणा तेथे दिसत नाहीत.