राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारातील संघटनांच्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीला अमरावतीत सुरुवात झाली असून, आजच्या पहिल्या दिवशी संघाच्या सुकाणू गटाचे (कोअर ग्रुप)मधील नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात येत्या १६ जुलैपर्यंतच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आल्याचे कळते. दरम्यान, उद्या,बुधवारी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह हे बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती मिळाली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि डॉ. प्रवीण तोगडिया बैठकस्थळी मंगळवारी सकाळी पोचले आहेत. येथील बडनेरा मार्गावरील व्यंकटेश लॉन परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संघ परिवारातील २८ संघटनांचे पदाधिकारी आणि संघप्रचारक असे २२५ प्रतिनिधी सहभागी होत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांचे सोमवारी रात्री शहरात आगमन झाले. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहकार्यवाह दत्ता होसबळे, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी यांच्यासह अनेक नेते बैठकीत सहभागी झाले आहेत.
संघाची ही वार्षिक बैठक अमरावतीत तब्बल २० वर्षांनंतर होत आहे. झेड प्लस दर्जाची सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे. राजनाथ सिंह हे दोन दिवस बैठकीत सहभागी होतील,असे समजते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येतील, असे सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम अद्याप पोलिसांपर्यंत पोचलेला नाही.
संघाच्या या बैठकीत ‘की रिस्पॉन्सिबल एरिया’वर अधिक चर्चा होणार असली, तरी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संघ परिवारातील संघटनांमध्ये समन्वय आणि निवडणूक रणनीती हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बैठकीदरम्यान संघटनात्मक पातळीवरील विषयांवर स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल, वर्षभरातील कामाचा लेखाजोखा ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रचारक आणि प्रमुख स्वयंसेवकांची बैठक ११ ते १३ तारखेपर्यंत होणार आहे. ही बैठक बंदद्वार असल्याने बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, याची उत्सुकता आहे. बैठकस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Story img Loader