लातूर : रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षात रविवारी लातूर शहरात त्यांच्या उपस्थितीत ‘विराट शाखा दर्शन’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास दत्तात्रय होसबळे हे उपस्थित राहणार आहेत. लातूर शहरातील ६१ वस्तीतील शाखा या रविवारी राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच ते सात या एकाच वेळात लागणार आहेत. या प्रत्येक शाखेत पन्नास स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिनाभरापासून याची जय्यत तयारी सुरू आहे. या वेळी दत्तात्रय होसबाळे यांचे ‘ बौद्धीक ’ होणार आहे. रा. स्व. संघाच्या कार्यशैलीमध्ये शाखा हे बलस्थान मानले जाते. कार्यकर्त्यांच्या एकत्रिकरणाची जागा म्हणजे शाखा. यामध्ये विविध विषयावर चर्चा होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाखा लागते म्हणजे काय?

शाखा काही एका दिवसात लागत नाही किंवा शाखेत ध्वज लावला म्हणजे लगेच स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होतील असे नाही. ज्या वस्तीत नवीन शाखा सुरू करायची असते त्यासाठी पूर्वतयारी केली जाते. घरोघरी संपर्क करत संघ म्हणजे काय त्यांना समजून सांगितले जाते.अनौपचारिक गप्पा होतात . एकमेकांना समजून घेतले जाते व अनौपचारिक संबंध निर्माण केले जातात .त्यानंतर सहज मैदानावर गप्पा मारण्यासाठी एकत्र येतात , खेळ, व्यायाम होतात, संघाच्या शाखेचा विषय चर्चेत निघतो व आता शाखा लावण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे असे वाटल्यानंतर प्रत्यक्ष शाखेला सुरुवात होते .त्यात वयोगटानुसार खेळ व व्यायाम घेतले जातात. पद्य म्हटली जातात. समाजासाठी आपण काही केले पाहिजे याचे भाव जागरण यातून निर्माण होते व संघाच्या प्रार्थनेने शाखेची सांगता होते. काही दिवस अशी शाखा चालल्यानंतर शाखेला ध्वज दिला जातो, शाखा सुरू होण्यापूर्वी ध्वज उभा केला जातो.

विराट शाखा दर्शन काय आहे ?

गेली ९९ वर्ष संघाचे काम सातत्याने सुरू आहे देशातील बहुतांश प्रांतात सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यापर्यंत काम पोहोचले आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाचे नेमके काम कसे चालते हे लोकांना प्रत्यक्ष पाहता यावे यातून संघाशी जवळीक वाढावी समाज एकसंघ व्हावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कार्यवाह किशोर पोतदार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtriya swayamsevak sanghs virat shakha darshan in latur on sunday mrj