आर्णी येथे आज शेतकऱ्यांनी काटातोलाई व भावसाढीसाठी आर्णी-यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आर्णी येथील एका खासगी जिनिंगमध्ये कापूस पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मात्र, लगेच ३१ डिसेंबरपासून पुन्हा खरेदी थांबविण्यात आली होती. त्यानंतर १९ जानेवारीपासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. २० दिवसाच्या फरकाने कापूस केंद्र सुरू झाल्याने सुमारे ५०० वाहने कापूस तोलाईसाठी असताना व एका दिवसात केवळ १०० वाहनांची तोलाई होत असल्याने शेतकऱ्यांना त्याची झळ पोहोचत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आर्णी-यवतमाळ मार्गावर आपला ठिय्या मांडला. त्यावेळी शेतकऱ्यांनी इतरत्र खासगी जिनिंगमध्येही कापूस खरेदी सुरू करावी, तसेच भावफरक म्हणून जे १०० रुपये कमी करण्यात येत होते ते धरून सरसकट ४०५० रुपये भाव देण्यात यावा, आदी मागण्यांसह हे आंदोलन पुकारले होते. हे कळताच आर्णी येथील पोलीस दल, तसेच बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, जि.प.सदस्य प्रवीण िशदे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पणन महासंघाचे अधिकारी बाविस्कर यांच्याशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढला. त्यानंतर लगेच शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. आतापर्यंत सुमारे ६५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला असून शासनाने तात्काळ भाववाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader