जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ बेंबळी परिसरातील रहिवाशांनी काळ्या फिती लावून बेंबळी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला व पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना निवेदन दिले. तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून हत्याकांडाचा निषेध केला.
उपसरपंच बाळासाहेब माने, ओबीसी संघर्ष समितीचे अरुण माने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोच्रेकऱ्यांनी हातात निषेध घोषवाक्याचे फलक घेऊन हत्याकांडातील आरोपींना पकडून त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, की स्वातंत्र्य मिळून ६७ वष्रे झाली, तरी दलित समाज सुरक्षित नाही. अस्पृश्यता हा शब्द कागदावरच राहिला. परंतु अस्पृश्यता आजही कायम आहे. दलित कुटुंबीयांच्या निर्घृण हत्येमुळे मानवी मूल्यांना काळिमा फासला गेला. दलित समाजावर वरचेवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली. फकिरा दलाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, तानाजी माने, राहुल गायकवाड, प्रशांत माने, निळकंठ माने, उत्तम मिसाळ, दयानंद गायकवाड आदी मोर्चात सहभागी झाले होते.
जळकोट येथे रिपाइंच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष एस. के. गायकवाड, आनंद पांडागळे, तानाजी कदम, अरुण लोखंडे, बाबासाहेब बनसोडे, अरुण कदम यांच्यासह जळकोटचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक समरसता मंचचे जवखेडाप्रकरणी आंदोलन
प्रतिनिधी, औरंगाबाद
नगर जिल्ह्यातील जवखेडा प्रकरणी आरोपींना शोधून शिक्षा करावी, या मागणीसाठी सामाजिक समरसता मंचच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना लाजिरवाणी असल्याचे सांगत राज्यात दलित समाजावर अन्याय वाढत आहेत, याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा, असेही निवेदनात नमूद आहे. डॉ. प्रसन्न पाटील व राहुल काकडे यांच्यासह निवेदनावर ३५ जणांच्या सह्य़ा आहेत. आंदोलनास भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनी भेट दिली.

Story img Loader