धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद, बीड व परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला. बीड जिल्ह्य़ातील केज, धारुरमध्ये बंद पाळण्यात आला. तर, परभणी जिल्ह्य़ातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी, राणीसावरगाव आणि देवगाव फाटा येथे झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
बीड- पाटोदा, माजलगांव येथे दोन तास चक्काजाम आंदोलन करून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, तिसऱ्या सूचित समावेश करण्याची केलेली शिफारस अयोग्य असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाच्या मुद्यावरून धारुर आणि केजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
परभणी- धनगर समाजाचा घटनेत तिसऱ्या सूचीत शिफारस करण्याची राज्य सरकारची भूमिका अमान्य असून अनुसूचित जमातीचेच आरक्षण हवे, या मागणीवर ठाम राहून आज जिल्हाभरात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, राणीसावरगाव आणि देवगाव फाटा याठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पाथरी येथील सेलू कॉर्नरवर ११ ते १ या दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. सेलू आणि माजलगावकडे जाणारी वाहने या वेळी रोखून धरण्यात आली. गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे गंगाखेड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जिंतूर येथील अण्णा भाऊ साठे चौकात आरक्षण कृती समितीने अर्धा तास रास्तारोको आंदोलन केले. सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथेही आंदोलन करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा