चिक्की व साहित्य खरेदीच्या ऐतिहासिक निर्णयाला कथित घोटाळ्याचे स्वरूप देऊन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरू असलेल्या बदनामीच्या निषेधार्थ सोमवारी भाजप व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे पुतळे जाळून संताप व्यक्त केला. दरम्यान, मुंडे उद्या (मंगळवारी) लंडनहून येणार असून, विमानतळावर चिक्की देऊन त्यांचे स्वागत करण्याचे काँग्रेसने जाहीर करताच उत्तरादाखल मुंडेसमर्थकही मोठय़ा संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
भाजप व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकत्रे पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ सोमवारी रस्त्यावर उतरले. मुंडे यांनी महिला व बालविकास खात्याअंतर्गत एकाच दिवशी २४ आदेश काढून २०६ कोटींची चिक्की व इतर साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडीतील मुलांसाठी अशा पद्धतीने निर्णय घेणाऱ्या मुंडे पहिल्याच मंत्री असताना राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांनी नियमानुसार झालेल्या खरेदीला घोटाळ्याचे नाव देऊन मुंडे यांची बदनामी चालवली, असा आरोप करीत भाजपचे कार्यकत्रे जागोजागी रस्त्यावर उतरले आहेत. आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत गेवराईत दोन्ही काँग्रेसच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रास्ता रोको करण्यात आले. वडवणीत दिनकर आंधळे, बाबरी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध करण्यात आला. रासप जिल्हाध्यक्ष राहुल बनकर यांच्या नेतृत्वाखाली नामलगाव फाटय़ावर दोन तास रास्ता रोको करीत वाहतूक अडवून धरण्यात आली. आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई, परळी आदी तालुक्यांतही ठिकठिकाणी रासप, भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
पंकजा मुंडे उद्या सकाळी लंडनहून मुंबईत येणार असून कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात मुंबईस येण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर कार्यकत्रे मुंबईकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी मंत्री मुंडे यांचे विमानतळावर चिक्की देऊन स्वागत करण्याचे जाहीर केल्यानंतर मुंडे समर्थकही काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तर देणार आहेत.
पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ भाजप-रासपचे ‘रास्ता रोको’
चिक्की व साहित्य खरेदीच्या ऐतिहासिक निर्णयाला कथित घोटाळ्याचे स्वरूप देऊन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरू असलेल्या बदनामीच्या निषेधार्थ सोमवारी भाजप व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे पुतळे जाळून संताप व्यक्त केला.
First published on: 30-06-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko of bjp rsp for support to pankaja munde