राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजातर्फे बुधवारी उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मेंढय़ांच्या कळपासह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख धनाजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेअकरा वाजता धनगर समाजबांधवांनी हे आंदोलन केले. मंडल अधिकारी अप्पा पाटील यांना दिलेल्या निवेदनात मल्हार सेनेने म्हटले आहे की, राज्यातील धनगर समाजास घटनेनेच अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट केले आहे. परंतु  ६० वष्रे लोटूनही केंद्र व राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी धनगर समाज सर्वच बाबतीत मागे राहिला. सरकारकडून धनगर समाजावर घोर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर व्हावा, या साठीच हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
स्वातंत्र्यापूर्वी १९११-२१ व १९३१ या बिलोग्राफीतही धनगर समाज एस. टी. प्रवर्गात आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या लोकलेखा समितीने २८ एप्रिल १८८९ च्या अहवालात धनगर समाज अनुसूचित जमातीत असल्याने त्यातील सवलतींची अंमलबजावणी करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रामराव पिसाळ, मुसाजी पिसाळ या विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मदाखल्यांवर धनगर असताना धनगर व धनगड ही एकच जमात ठरवून त्यांना एसटी प्रवर्गातून मेडिकलसाठी प्रवेश देण्याचे सरकारला आदेश दिले होते. या सर्व बाबींवरून धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांनी धनगर समाजास आरक्षण देण्यास विरोध दर्शविणाऱ्या आदिवासी समाजाचे नेते मधुकर पिचड यांचा जाहीर निषेध नोंदविला. आंदोलनात धनगर समाजबांधव मेंढय़ा घेऊन सहभागी झाले होते. आंदोलनामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास खोळंबली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा