Maharashtra Declares Day of Mourning : उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजचे राज्य शासनाचे सर्व कार्यक्रम उद्या शुक्रवारी घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आत रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“आज दुर्मिळ रत्न हरपले. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा समुहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.