अलिबाग- रतन टाटा यांनी अलिबागच्या डॉ. संदीप केळकर यांना स्वहस्ताक्षरात लिहिलेले एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. वरसोली येथील बंगल्यावरील कर्मचाऱ्याला श्वान दंशानंतर डॉ. केळकर यांनी दिलेल्या रुग्ण सेवेबाबत त्यांनी आभार मानले होते. हे पत्र टाटा यांनी ९ जानेवारी २००४ रोजी डॉ. केळकर यांना लिहिले होते. पत्रासोबत त्यांनी टायटन कंपनीचे एक घड्याळही डॉक्टरांना पाठवून दिले होते.
वरसोली येथील समुद्र किनाऱ्यावर रतन टाटा यांचा एक बंगला आहे. शनिवार आणि रविवारी ते सुट्टीसाठी येथे येऊन राहत असत. येताना आपल्या घरातील लाडक्या श्वानांना ते आवर्जून सोबत आणत असे. रतन टाटा यांचे श्वान प्रेम सुपरिचीत होते. त्यामुळे त्यांच्या घरी आणि ऑफीसमध्येही श्वानांसाठी हक्काची जागा असे.
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला त्यांच्या वरसोली येथील बंगल्यावरील एका कर्मचाऱ्याला श्वान दंश झाला. पोटरीला चावा घेतल्याने कर्मचाऱ्याला मोठी जखम झाली होती. रात्रीची वेळ असल्याने या कर्मचाऱ्याला वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे म्हणून हा कर्मचारी जोगळेकर नाका येथे असलेल्या डॉ. संदीप केळकर यांच्या दवाखान्यात आला. त्याने आपण रतन टाटा यांच्याकडून आलो असून, श्वान दंश झाला असल्याचे डॉकटर केळकर यांना सांगितले. डॉ. केळकर यांनी तातडीने या जखमी कर्मचाऱ्यावर उपचार केले. त्याचे लसीकरण केले. मात्र उपचाराचे कुठलेही पैसे त्या कर्मचाऱ्याकडून घेतले नाही. रतन टाटा यांच्याकडून आले आहात मग औषध उपचाराचे पैसे कसे घेणार सांगून त्या कर्मचाऱ्याला परत पाठवले. ही बाब जखमी कर्मचाऱ्याने रतन टाटा यांना सांगितली. तेव्हा रतन टाटा यांनी स्वहस्ताक्षरात पत्र लिहून डॉ. केळकर यांचे आभार मानले. आणि नववर्षाची भेट म्हणून एक टायटन कंपनीचे हाताचे घड्याळ भेट म्हणून पाठवून दिले. डॉ. केळकर यांनी हे पत्र जपून ठेवले आहे. रतन टाटा यांनी लिहिलेले हे पत्र सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहे.