Ratan Tata Will : भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, तेव्हा संपूर्ण देश हळहळला. खरं तर रतन टाटा यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं असल्याचं मानलं जातं. रतन टाटा यांच्याविषयी संपूर्ण देशाला एक आपुलकीची भावना आहे. उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ओळख होती. दरम्यान, आता दिवंगत रतन टाटा यांचं मृत्यूपत्र नुकतंच उघडण्यात आलं आहे. त्यांच्या या मृत्यूपत्रात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात एका व्यक्तीच्या नावावर तब्बल ५०० कोटींहून अधिकची संपत्ती सोडली आहे. मात्र, नेमकं ही व्यक्ती कोण? याविषयी अनेकांना प्रश्न पडले आहेत. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या संपत्तीमधील एक तृतीयांश हिस्सा म्हणजे जवळपास ५०० कोटी पेक्षा जास्त संपत्ती मोहिनी मोहन दत्ता यांना दिली आहे. त्यामुळे मोहिनी मोहन दत्ता नेमकं कोण आहेत? याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सच्या हवाल्याने मनी कन्ट्रोलने दिलं आहे.

रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावाचा उल्लेख केला असल्याची माहिती समोर आली आहे. मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूरमधील रहिवासी असून ते ट्रॅव्हल क्षेत्रात काम करतात. खरं तर मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात आल्यामुळे टाटा कुटुंबालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण दत्ता हे प्रदीर्घ काळापासून त्यांचे सहकारी होते असं बोललं जात आहे. तसेच रतन टाटा यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी ते एक होते असंही म्हटलं जात आहे. तसेच दत्ता यांनी देखील स्वतःला टाटा कुटुंबातील सदस्यांच्या जवळचे असल्याचं म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मोहिनी मोहन दत्ता कोण आहेत?

मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूर येथील ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजक आहेत. ते आणि त्याचे कुटुंब स्टॅलियन या ट्रॅव्हल एजन्सीचे मालक होते. २०१३ मध्ये ते ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग असलेल्या ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन करण्यात आले. दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची स्टॅलियनमध्ये ८० टक्के हिस्सेदारी होती, तर २० टक्के भागीदारी टाटा इंडस्ट्रीकडे होती असं अहवालात म्हटलं आहे. दत्ता यांच्या एका मुलीने २०१५ पर्यंत ताज हॉटेल्समध्ये काम केले आणि त्यानंतर २०२४ पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम करायला सुरुवात केली. दरम्यान, रतन टाटा २४ वर्षांचे असताना जमशेदपूरमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती, तसेच त्यांनी मला मदत केली आणि मला घडवलं असं रतन टाटा यांच्याबाबत दत्ता यांनी म्हटलं होतं.

Story img Loader