भारतीय जनता पार्टीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवाय, चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीकाही सुरू झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावबाबत स्पष्टीकरण देत, दिलगीरीही व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर शाईफेकली यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिकचे फेसशील्ड लावल्याचं दिसून आलं. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या सभोवतलचा आणि कार्यक्रमस्थळावरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. त्यांनी लावलेल्या फेसशील्डचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा – “पंतप्रधान मोदींशी आमचे वैचारिक मतभेद असले, तरी…” रोहित पवारांचं विधान!
“यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर अधिक हितकारक असेल असे वाटते. विचार तत्वाधिष्टीत असेल तर धैर्याची जोड आपसूकच मिळते. मग कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शाळा काढली तेव्हा चिखलफेकीचा सामना केला, पण पदराने ही तोंड झाकले नाही.” असं सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील काल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना ते पवनाथडी यात्रेला उपस्थित राहणार होते. तर, सांगवी येथे त्यांच्यावर शाईफेक करण्यात येईल, अशी धमकी फेसबुकवरून देण्यात आली होती. या धमकीमुळे चंद्रकांत पाटलांनी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिकचे फेसशील्ड लावल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली होती. शिवाय जिथे त्यांचा कार्यक्रम आहे, तिथेही पोलीस बंदोबस्त तैनात होता.