Ration Card Printing : शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही. कारण आता रेशनकार्ड छपाई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही. याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात. तसंच, तुमच्याकडे असलेले रेशन कार्डही वॅलिड राहणार आहे. यासंदर्भात नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी टीव्ही ९ ला सविस्तर माहिती दिली.
नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे, रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई-पॉजद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो. आधी या वितरित केलेल्या मालाची रेशनकार्डवर त्याची नोंद घेतली जात होती. आता ई पॉज आल्याने आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येते. त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद केली. ई शिधापत्रिका वॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल. तसंच, सरकारी योजनांचा लाभही यातून घेऊ शकतो.
हेही वाचा >> थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
ई रेशन कार्डचं वर्गीकरण कसं होणार?
उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशनकार्डचे वर्गीकरण केलेले आहे. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशनकार्ड दिले जाते. सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. परंतु, या रेशनकार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई- रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण कसं होणार? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी पडोळे म्हणाले, ई – रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे.
दरम्यान, तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई- शिधापत्रिकाच मिळणार आहे. तसंच, ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे, त्यांना जर दुय्यम ई – रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे. सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत, त्याचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई-रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे, असंही पडोळे यांनी स्पष्ट केलं.
© IE Online Media Services (P) Ltd