सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात रेशनिंग धान्य दुकानावर रास्त भावाचा धान्य पुरवठा अल्प करण्यात येत असल्याने रेशनिंग दुकानदारांनी धान्य उचल करण्यास नकार दिला, तसेच गेली २० वर्षे धान्य दुकानदारांना मिळणारा रिबीट (मार्जिन)मध्ये वाढ करण्यात आली नसल्याने धान्य दुकानदारांत नाराजी आहे.
रेशनिंग धान्यधारकांना प्रत्येकी दोन किलो तांदूळ द्यावा, असे निर्देश पुरवठा विभागाने देऊन रेशन कार्डनुसार धान्य दुकानदारांना धान्य वाटप करण्याची तयारी दर्शविली, पण दुकानदारांचे आर्थिक नुकसान व रेशनकार्डधारकांचा रोष पत्करण्यापेक्षा धान्य उचल करायची नाही, असा निर्णय रेशन दुकानदारांनी घेतला आहे.
रास्त भावाच्या दुकानदारांना धान्य विक्रीनुसार रिबेट-मार्जिन दिले जाते. पण गेल्या २० वर्षांत त्यात वाढ झालेली नाही. प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेलची भरमसाट वाढ होऊनही शासनाच्या पुरवठा विभागाने दुकानदारांना वाढ दिली नसल्याने दुकानचालक आर्थिक टंचाईत आले आहेत.
शासनाच्या पुरवठा विभागाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधूनही मार्जिन वाढवून दिले नाही. तसेच अपुऱ्या धान्यपुरवठय़ामुळे दुकानदारांनी धान्य उचल करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभाग त्यासाठी लवकरच बैठक घेणार आहे, असे सांगण्यात आले.

Story img Loader