गुहागर : चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर पर्यटकांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स जावून आदळली. या अपघातात चालकासह १७ जण जखमी झाले आहेत. कल्याण डोंबिवलीतून गुहागरला जाणाऱ्या टेम्पोला घोणसरे सुतारवाडी येथे हा अपघात झाला.
कल्याण डोंबिवली येथील पोंक्षे परिवारातील १७ जण पर्यटनासाठी ६ डिसेंबरला सकाळी डोंबिवलीतून निघाले होते. त्यांनी १७ आसनी प्रवासी टेम्पो ट्रॅव्हल्स भाड्याने घेतली. ६ डिसेंबरला गुहागरला व्याडेश्वर दर्शन, समुद्राचा आनंद लुटून ही मंडळी संगमेश्वर तालुक्यातील पोंक्षे आंबव येथे जाणार होती. सायंकाळी ही गाडी पूल ओलांडून घोणसरे सुतारवाडी बसथांब्यापर्यंत आली असता चढ आणि छोटे वाकाणात गाडी आली असता चालकाला डुलकी लागली. आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. ही गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली उतरली आणि एका झाडावर जावून आदळली. या धडकेनंतर गाडी जागीच उलटली. चालक आणि प्रवासी फुटलेल्या काचेतून बाहेर पडले.
ही घटना समजल्यानंतर घोणसरे सुतारवाडीतील ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांनी अपघातग्रस्त गाडीमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. गाडीतील मागील दरवाजा उघडून १५ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तातडीने खासगी वाहनांनी सर्वांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार १७ प्रवासी व चालक यांच्यापैकी एक महिला व एक पुरुष यांची प्रकृती अधिक गंभीर आहे. अन्य १५ प्रवाशांवर चिपळूण येथेच उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd