रत्नागिरी : विधानसभेतील पराभवानंतर रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असताना आता हा वाद देवाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांविरोधात ठाकरेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातिस येथील पीर बाबरशेख यांच्या मशिदीत जावून गाऱ्हाणेच घातले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळखळ उडाली आहे.
रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनीच गद्दारी केल्याने येथील उमेदवार पडल्याने शिवसेना ठाकरे गटाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत मोठ्या फरकाने निवडून आले. त्यात ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र हा पराभव काहीच्या गद्दारीमुळे झाल्याचे सांगून माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले होते. काही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. यामध्ये जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना टार्गेट करण्यात आले होते. मात्र हा वाद आता देवाच्या दारापर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा – आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी रविवारी शहराजवळच असलेल्या हातिस येथे जाऊन पीर बाबरशेख बाबांचे दर्शन घेतले आणि पक्षाचे चांगले संघटन रहावे आणि विरोधी काम करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, असे गाऱ्हाणे घातले. याप्रकाराची आता जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. तसेच शिवसैनिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.