Ratnagiri : रत्नागिरीत वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाचा भाजपा आणि सकल हिंदू समाजाने तीव्र निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त केला गेला होता. या कार्यक्रमादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध केला. जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. जय श्रीराम चा नारा देत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला ,यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.

नेमकं काय घडलं?

रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा आणि भाजपचा तीव्र विरोध होता. त्यामुळे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पण वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या बाहेर उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांना आंदोलकांची गर्दी बघून कार्यक्रम उरकावा लागला. उदय सामंत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाहेर आले, त्यावेळी देखील आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Black Flags Shown to Uday Samant At Ratnagiri
रत्नागिरीत भाजपा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे (फोटो- RNO)

उदय सामंत यांना दाखवण्यात आले काळे झेंडे

रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी रत्नागिरीत मोठा गोंधळ बघायला मिळला. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. पण भाजप आणि सकल हिंदू समाजाचा या कार्यक्रमास विरोध आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून या विरोधात निदर्शने दिली. यावेळी आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांनादेखील काळे झेंडे दाखवले. उदय सामंत आले त्यावेळेला सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. वक्फ बोर्डाचं कार्यालय रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत राऊल यांनी काय म्हटलं आहे?

जानेवारी महिन्यात मोर्चा झाला होता त्यालाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आज आम्ही वक्फ बोर्डाच्या विरोधात मोर्चा काढला त्यालाही पोलिसांनी संमती नाकारली आहे. वक्फ बोर्ड कार्यालय होऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं. तरीही छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यलायतून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाला निरोप देण्यात आला की ५०० स्क्वेअर फुटांची जागा द्या. या गोष्टीला आमचा विरोध आहे असं चंद्रकांत राऊल यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत राऊल हे सकल हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत.