चिपळूण : पुणे येथून कुंभार्ली गावी महाशिवरात्रिच्या यात्रेला निघालेल्या माय लेकाचा कारच्या भीषण अपघातात मृत्यु झाला. कार २०० फुट दरीत कोसळून झालेला हा अपघात दोन दिवसांनी, मंगळवारी सायंकाळी उशिरा उजेडात आला.
या अपघातात विश्वजित जगदीश खेडेकर (वय ४२) तर सुरेखा जगदीश खेडेकर (वय ६५) या दोघाचा मृत्यू झाला. विश्वजित खेडेकर हे आपल्या आईसोबत स्विफ्ट डिझायर कारने पुणे येथून कुंभार्ली येथे महा शिवरात्र यात्रेसाठी गावी जात होते. त्यांची कार कुंभार्ली घाटात पोहोचली असता गाडी खोल २०० फुट दरीत कोसळली. यात दोघांना जबर मार लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उशिरा ही घटना उघडकीस आली विश्वजित व सुरेखा जगदीश खेडेकर हे दोघे महाशिवरात्री यात्रेसाठी कारने पुणे येथून गावी कुंभार्लीकडे येत असताना पाटण येथे रविवारी रात्री साडे आठ वाजता जेवण आटोपून रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली घाटातील पोलीस चौकीपासून कार पुढे निघून गेली असता चौकीपासून तिसऱ्या अवघड वळणावर सुमारे दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली.
या दोघाचा मोबाईल लोकेशन आणि ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता मायलेकाचे मृतदेह सापडले. अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर कुंभार्ली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या अपघातामुळे खेडेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. खेडेकर यांच्या मागे मुले, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे.