रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरात सांगली वरून आणलेला गांजा सदृश पदार्थ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला. ५ किलो पेक्षा जास्त व सव्वा तीन लाखापेक्षा जास्त किंमतीचा गांजा पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर व पोलीस अंमलदार हे कोकणनगर ते प्रशांत नगर अशा परिसरात गस्त घालीत असताना साईभुमी नगर बिल्डींगचे मागील बाजुला एक इसम संशयास्पद हालचाल करत असताना दिसून आला. त्याला पोलीसांनी जागीच थांबवुन चौकशी केली असता त्याने आपले नाव मन्सुर अली निजाम पठाण, (वय ४०) रा. मिरज जि. सांगली असे सांगितले.

या इसमाची पंचांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ३ लाख २५ हजार ५०० रुपये किंमतीच्या पाच ब्राऊन कलरचे प्लास्टीकचे पाऊच त्यामध्ये ५ किलो ५५.५ ग्रॅम उग्रवासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला.याप्रकरणी मन्सुर अली निजाम पठाण याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले. तसेच त्याच्या ताब्यातून ३ लाख २५ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी विक्री करतात अशी माहिती मिळत होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सुचना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सतिश शिवरकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/अंमलदार याबाबत रोज निहाय अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती मिळवण्याचे काम करत होते.