रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील वाळवड येथील वीस शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम सतरा वर्ष होवून देखील राज्य शासनाकडून अदा न करण्यात आल्याने न्यायलयाने चक्क जिल्हा प्रशासनाची साहित्य मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. मात्र या कारवाईच्या वेळी संबंधीत शेतकरीच अनुपस्थित राहील्याने ही जप्तीची कारवाई काही काळासाठी टळली आहे.
राजापूर तालुक्यातील वाळवड येथील वीस शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागेची जमीन २००७ मध्ये धरणस्थळ, बुडित क्षेत्र व सांडव्यासाठी संपादित करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने या बाधित शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य शासनाचा कारभार पहाणा-या उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी ही नुकसान भरपाई १७ वर्षे उलटून देखील शेतकऱ्यांना अदा केली नाही. याविषयी शेतक-यांनी २०१९ मध्ये रक्कम वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे या शेतक-यांची नुकसान भरपाईची रक्कम वसुल करण्यासाठी न्यायालयाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्ची, कॉम्प्युटर, कपाटे यासारखे साहित्य जप्तीचे आदेश दिले.
हेही वाचा…विठ्ठल नित्यपूजेच्या ‘ऑनलाईन’ नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
न्यायालयाच्या आदेशानुसार बेलिफ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले, मात्र यावेळी संबंधीत शेतकरी हजर न राहिल्याने ही जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यात आली.