रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात असलेल्या कोळंबे येथील कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष व त्यांचा मुलगा आणि मुख्याध्यापक अशा तिघांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शहर पोलीस ठाण्यातून संगमेश्वर पोलीस ठाण्यात झिरो नंबरने पाठवण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अध्यक्ष नयन मुळ्ये (वय ६८), त्याचा मुलगा प्रथमेश मुळ्ये आणि मुख्याध्यापक संजय मुळ्ये या तिघांचा समावेश आहे. याविषयी संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा – Sharad Pawar: “मी थोरला, माझ्या नादी लागू नका…”, शरद पवारांची सुशीलकुमार शिंदेंना तंबी
कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या या तिन्ही मुली गणपती सुट्टीदरम्यान आपल्या गावी गेल्या नव्हत्या. त्यातील एक १७ वर्षीया पीडिता ही फिर्यादी असलेल्या ग्रंथपाल महिलेकडे या सुट्टीत राहाण्यासाठी गेली होती. त्यानंतर फिर्यादी आपल्या गावी गेल्यानंतर ती पीडिता ही संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांच्या घरी राहाण्यासाठी गेलेली असताना संशयित नयन मुळ्येने तिचा विनयभंग केला. तर त्याच्या मुलाने पीडितेला धमकावले. याबाबत तिने मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीडितेने गणपती सुट्टीनंतर घडलेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेला सांगितला. असे तिने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तर अन्य दोन पीडितांचा विनयभंग कोठे करण्यात आला याचा तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. मात्र याविषयी तक्रारीनंतर तिघांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd