रत्नागिरी : दापोली तालुक्यात असलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (युनेस्कोने) या जलदुर्गाची पाहणी केली होती. त्यानुसार लागणाऱ्या सोयीसुविधा, बेकायदेशीर बांधकामे हटवणे, पाणी, शौचालय, पार्किंग आदी गोष्टीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या सुविधा पूर्ण झाल्यास सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सिंह, बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी हर्णे किल्ला आणि परिसरामध्ये काय सुविधा देता येतील? याविषयी पाहणी केली. दापोली शहरापासून हर्णे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक उपलब्ध आहे. हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा देण्याच्यादृष्टीने युनेस्को संस्थेने नुकतीच या किल्ल्याची पाहणी करून काही सुधारणा आणि सुविधा सुचवल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून येथील नियोजन आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने हर्णे आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. आता प्रशासनाकडून युनेस्कोला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी

सुवर्णदुर्गाचे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतल्याचा इतिहास आहे. इ. स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार होन खर्च केले, असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri dapoli suvarnadurga fort world heritage site status css