रत्नागिरी : रस्तेविकास आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याने ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’मध्ये आर्थिक विकासाची घोडदौड कायम राखली आहे. शेती, पर्यटन, मत्स्य व्यवसायाला उद्याोगाची जोड मिळू लागल्याने दरडोई उत्पन्नाचा देखील आलेख उंचावू लागला आहे.

एका बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दोन्हीच्या मध्ये आंबा, काजू, नारळ सुपारीच्या बागा, सोबतीला सदाहरित वनांचे आच्छादन, निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला रत्नागिरी जिल्हा हा कोकणातील समृद्धीच्या निर्देशांकात कायमच वरचढ राहिला आहे. मात्र आता आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासातही जिल्ह्याची कामगिरी लक्षवेधक ठरू लागली आहे.

चांगले रस्ते हे विकासाची गती वाढवतात. पूर्वी मुंबई गोवा महामार्ग हाच रत्नागिरीसाठी वाहतुकीचा एकमेव पर्याय होता. नंतर त्यात कोकण रेल्वेची भर पडली, त्यामुळे वाहतुकीच्या कक्षा रुंदावल्या, राष्ट्रीय महामार्गाबरोबर जिल्ह्यात राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गांच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्यामुळे वाहतुकीच्या चांगल्या सोयीसुविधा निर्माण झाल्या. येणाऱ्या काळात त्यात रेवस रेड्डी सागरी महामार्ग आणि ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाची भर पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कक्षा अधिकच रुंदावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात २०२३-२४ अखेरपर्यंत एकूण १० हजार ५१७ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. ज्यात ८ हजार किमीच्या डांबरी रस्त्यांचा, तर २ हजार किमीच्या इतर रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्यांचे चांगले जाळे जिल्ह्यात निर्माण झाले आहे. वाहतुकीची चांगली साधने निर्माण झाल्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळाली आहे.

कोकणात पारंपरिक व्यवसाय करण्याकडे पूर्वी लोकांचा कल असायचा. शेती, मत्स्यव्यवसाय, बागायती याभोवती जिल्ह्याचे अर्थकारण फिरत राहायचे. अलीकडच्या काळात त्यात उद्याोगांची भर पडली. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येऊ लागली. २०२३-२४च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३७८ कारखाने सध्या कार्यरत आहेत. ज्यात ३० हजार ६१२ कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्याचे स्थूल उत्पन्न सन २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार ४३ हजार कोटी असून, राज्याच्या सरासरी स्थूल उत्पन्नात रत्नागिरी जिल्ह्याचा वाटा १.२० टक्के एवढा आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे २ लाख २१ हजार ५४५ एवढे आहे. राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत दरडोई उत्पन्नाचे प्रमाण चांगले आहे.

खेड तालुक्यातील लोटे येथे हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे. तर रत्नागिरी येथे टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य संवर्धन केंद्राचे भूमिपूजन झाले आहे. रिलायन्स कंपनीचा संरक्षण साहित्यविषयीचा प्रकल्प येणार आहे. तर बारसू येथे येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या उद्याोगामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या अर्थकारणाला अधिक गती प्राप्त होणार आहे. तसेच पर्यटन स्थळांचा विकास शासनाने हाती घेतल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणाला आणखीनच चालना मिळणार आहे.

मुद्रा कर्जवितरणात प्रगती

रत्नागिरी जिल्ह्यात सरकारी व सहकारी बॅंकाचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आज गावागावात बॅंकांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. सहकारी संस्था गावात सर्वत्र बघायला मिळत आहेत. गावातील आर्थिक उलाढाल या बँकांच्या मदतीने सोपी झाली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मार्च २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यात ४६३ कोटींची कर्जे मंजूर करण्यात आली. त्यापैकी ४५४ कर्जे वितरित करण्यात आली आहेत. तब्बल ४१ हजार ०३४ लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत कर्जपुरवठा झाला आहे. शिशुगटात ८२ कोटी, किशोर गटात २२४ कोटी, तर तरुण गटात १५६ कोटींच्या मुद्रा कर्ज वितरणाचा समावेश आहे. त्यामुळे मुद्रा योजनेतही जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

दृष्टिक्षेपात जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ हजार २०८ चौरस किलोमीटर असून त्यामध्ये १ हजार ५३७ गावं, १६ शहरं असलेल्या जिल्ह्यात १६ लाख १५ हजार ६९ लोकसंख्या आहे. त्यातील १३ लाख ५१ हजार ३४६ ग्रामीण तर २ लाख ६३ हजार ७२३ शहरी भागात लोक राहतात. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ११५ कुटुंबं आहेत. २ लाख ४७ हजार ३३२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या वाढत्या प्रगतीमध्ये विजेचा देखील वापर वाढला आहे. दरडोईमागे जिल्ह्यात ५७९ किलोवॉट विजेचा वापर होत आह

रत्नागिरी जिल्ह्याला सलग दोन वर्ष जिल्हा निर्देशांकमध्ये पारितोषीक मिळाले आहे. हे माझ्या सर्व अधिकारी वर्गाचे श्रेय आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील वर्षी देखील असेच पारितोषिक मिळण्याकरिता नियोजन केले जात आहे. जिल्हा विकासासाठी पुढील ३० वर्षाचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहाय्याने निधीची तरतूद करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याची उंचावलेली कामगिरी इतर जिल्ह्यांच्या मानाने कौतुकास्पद आहे.-एम. देवेंदर सिंग, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

Story img Loader