रत्नागिरी – लोटे औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री पुष्कर केमिकल अँड फर्टीलायझर्स या कंपनीच्या एक नंबर युनिटमधील इथेनिल ऑक्साईडच्या साठवण टाकीचा स्फोट झाल्याने टाकीला आग लागली. या स्फोटामध्ये संदीप मैती (वय ४२) हा कामगार किरकोळ जखमी झाला. ही घटना गुरुवारी १८ जुलैला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
हेही वाचा – सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात गोंधळ
लोटे येथील श्री पुष्कर केमिकल्स या कारखान्यातील युनिट १ मध्ये इथेनॉल ऑक्साईडच्या साठवण टाकीचा प्रमुख वॉल उडून स्फोट झाला. यावेळी आतील रसायनाच्या वाफांनी पेट घेतला. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर नजीकच असलेल्या लोटे माळवाडीमधील शेकडो ग्रामस्थ कंपनीच्या गेटवर जमा झाले. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ही आग पाऊण तासात आटोक्यात आणली. या वेळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना लोटे येथील प्रसन्न पटवर्धन व बाबुराव काते यांच्या खाजगी टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आला. ही साठवण टाकी अत्यंत ज्वलनशील अशा इथेनॉल ऑक्साईडने भरलेली होती. मात्र कारखाना व्यवस्थापनाने योग्य ती काळजी घेऊन ती टाकी मुख्य प्लांटपासून काही अंतरावर बसविली असल्याकारणाने मोठी दुर्घटना टळली. यामधे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही एक कामगार किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd