मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी माईचा लाल आला तरीही बंद पडणार नाही. महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. बहिणींना लखपती झालेले मला पहायचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी येथील चंपक मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Rahul Gandhi on Badlapur: राहुल गांधींची बदलापूर प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते लपविण्यासाठी…”

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रक्षाबंधनाचा सण एक दिवसाचा असला तरी, भावा-बहिणींमधील ऋणानुबंध कायमचे असतात. तुमचा हा भाऊ आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. ज्यांना अजून लाभ मिळाला नाही, त्यांच्याही खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत. कुटुंब चालवताना बहिणींना कसरत करावी लागते. त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने आणली आहे. मुख्यमंत्री असलेला तुमचा हा भाऊ माहेरचा आहेर वाढवत जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनेक योजनांच्या माध्यमातून माझ्या बहिणींना लखपती होताना बघायचे आहे. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. हे घेणारे सरकार नसून, हे देणारे सरकार आहे. जे करु शकतो तेच बोलणार आहे. या योजनेत सगळीच यंत्रणा कामाला लागली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे, तुमच्या सावत्र भावांना जळजळ, मळमळ होऊ लागली आहे.

बदलापूर येथील घटनेविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. फास्टट्रॅकवर ही केस चालणार असून संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. हे सरकार त्या आरोपींना फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मात्र या चिमुरडीच्या जिवावर कोणी राजकारण करू नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हात कलम करण्याचा, छाटून टाकण्याचा इतिहास आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सर्व भगिनींना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ओवाळणी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यास सुरुवात झाली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनीही मेहनत घेऊन घराघरात जाऊन या योजनेचे अर्ज भरले. या योजनेचा त्यांनादेखील लाभ मिळाला आहे. सिंधुरत्न योजनेमधून टुरिस्ट बस महिलांना देण्यात आल्या आहेत. ती चालविण्याची जबाबदारीही त्यांना दिली आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा राज्यातला रत्नागिरी पहिला जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Ajit Pawar : “अरे…! चटके आणि फुलं नको नको झालीय”, अजित पवारांनी भर कार्यक्रमात टोचले धनंजय मुंडेंचे कान

पालकमंत्री सामंत म्हणाले, या योजनेचा शासन निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून काही जण कोर्टात गेले पण काही उपयोग झाला नाही. भगिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करु शकलो, हा आनंद आम्हा सर्वांना आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाचीही बिशाद नाही, ही योजना थाबविण्याची. हा निधी आपल्या आरोग्यासाठी वापरला पाहिजे. महिला भगिनींना त्रास देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

यावेळी रिमोटद्वारे सर्व जिल्हास्तरीय योजनांचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे पत्र जिल्ह्यातील भगिनिंच्यावतीने पालकमंत्री सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी विमानतळ टर्मीनलच्या इमारतीचे भूमिपूजन, रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन आणि नामकरण करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri ladki bahin yojana will not be stopped says cm eknath shinde ssb