चिपळूण – गेली कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने परतीच्या पावसातही दगा दिला. महामार्ग तयार करण्यासाठी पेढे नजीक केलेला मातीचा भराव बुधवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसात वाहून गेला. त्यामुळे रस्त्यालाही धोका निर्माण झाला आहे. सध्या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहन चालक सध्या जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम १८ वर्षांपासून रखडलेले आहे. परशुराम घाट ते कशेडी घाट पायथा या दरम्यानच्या ४४ किलोमीटर रस्त्याचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. अन्य तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीने महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण केले असले तरी संपूर्ण ४४ किलोमीटरच्या रस्त्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. हे आता हळूहळू जनतेसमोर येऊ लागले आहे. सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याला कुठेही लेवल नाही. त्यामुळे रस्त्यावरून धावणारी वाहने आदळत, आपटत धावत असतात. चौपदरीकरणापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता असे म्हणायची वेळ वाहन चालकांवर आली आहे. परशुराम घाटात रस्ता बनविण्यासाठी डोंगर कटाई करण्यात आली. तीही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आता त्या तयार रस्त्यावर पावसाळ्यात दरडी कोसळत आहेत. यावर्षी पावसाळ्यात सुरवातीलाच दरडी कोसळल्या. काही ठिकाणी मातीचा भराव टाकून रस्ता बनविण्यात आला आहे. त्याच्या बाजूला संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या दोन मारेकऱ्यांना अटक करणाऱ्या १० पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस?

हेही वाचा – Mahadev Jankar : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षासह महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा

गुरुवारी पहाटे परतीच्या पावसात मातीचा भराव आणि रस्त्याच्याकडेला बांधलेली संरक्षक भिंत वाहून गेली. रस्त्याच्या खालील मातीचा भरावही वाहून गेला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथपासून काही अंतरावर पेढे गावची लोकवस्ती आहे. सुदैवाने हा भराव लोकवस्तीमध्ये गेला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा असल्यामुळे तो तुटला नाही. पहाटेच्या दरम्यान घडलेली ही घटना वाहन चालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याठिकाणाहून वाहने नेण्याचे टाळले. सकाळी या घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला मिळाल्यानंतर महाड येथील उपअभियंता अमोल माडकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ हा रस्ता बंद करून उजव्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली.