एकनाथ शिंदे यांना आदल्या दिवशी मुख्यमंत्रिपदाचा आमचा उमेदवार जाहीर करु असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. एका रात्रीत एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे काँग्रेससह जात मुख्यमंत्री झाले. अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं का? उद्धव ठाकरेंना सत्ता हवी, मुख्यमंत्रीपद हवं म्हणून त्यांनी पक्ष संपवला असंही रामदास कदम म्हणाले आहेत. रत्नागिरीत त्यांनी ही टीका केली आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
“आपल्या वडिलांशी बेईमानी करणारी अवलाद कोण असेल तर तो म्हणजे उद्धव ठाकरे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेसबरोबर जाणार नाही, काँग्रेसबरोबर जायची वेळ आली तर शिवसेना बंद करुन टाकेन. त्या शिवसेनाप्रमुखांचा मुलगा नालायक निघतो आणि काँग्रेसबरोबर जाऊन सोनिया गांधींचे पाय चाटतो. हा इतरांना गद्दार म्हणतो तुझी औकाद काय? जे शिल्लक राहिलेत ना त्या दहा जणांना निवडून आणून दाखव.” असं आव्हान रामदास कदम यांनी दिलं आहे.
गद्दार, खोके या आरोपांचं उत्तर मी देणार
“खोके, बोके, गद्दार या सगळ्याची उत्तरं मी देणार आहे. अजित पवार आणि त्यांचे आमदार आले तेव्हा यांच्यापैकी कुणीही त्यांना खोके आणि गद्दार का म्हटलं नाही? मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून याला त्रास होतं. १९६६ मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी कधीही कुठलंच पद घेतलं नाही. तू काय केलं? ” असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.
एका रात्रीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला
” २०१९ मध्ये याने (उद्धव ठाकरे ) आदल्या दिवशी जाहीर केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. एका रात्रीत एकनाथ शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून तू मुख्यमंत्री झालास ते पण काँग्रेससह जाऊन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं का? पण यांना सत्ता हवी. सत्ता मिळवण्यासाठी आणि मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पक्ष संपवला. प्रमोद नवलकर यांचे फोन हा माणूस घेत नव्हता. तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही प्रमोद नवलकर यांच्या मुलीला जाऊन वस्तुस्थिती विचारा. मी खोटं बोलतोय असं तिने सांगितलं तर मी राजकारण सोडून देईन. ” असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईन’च्या घोषणा देत होते तेव्हा टरबूज होते, आता पार…”, उद्धव ठाकरेंचा टोला
“किल्ले रायगड शिवरायांचा गड आहे, तुमच्यासारख्या बेईमानांचं काम या रायगडात नाही. मोदींवर टीका कसली करता आहात? तुमची औकाद काय लायकी काय? उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी अडीच वर्षात किती निधी दिला ते सांगा. सध्या त्याची पोपटपंची सुरु आहे. शरद पवार तीन दिवस कोकणात येऊन बसले होते. मात्र हा माणूस हा आला नाही.” असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.