‘सीबीएसई’ दहावीत दुसऱ्या आलेल्या रत्नागिरीच्या सलोनीची प्रतिक्रिया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योग्य दिशेने सातत्यपूर्ण अभ्यास आणि शाळेचा अभ्यासाचा पॅटर्न फलदायी ठरला, अशी प्रतिक्रिया आहे खेडच्या रोटरी सीबीएसई स्कूलच्या सलोनी जोशी या विद्यार्थीनीची. रत्नागिरी जिल्ह्य़ातील छोटय़ाशा खेड शहरातील सलोनी सीबीएसईच्या दहावी परीक्षेत ९९.८० टक्के मिळवून देशातून दुसरी आली. विशेष म्हणजे या शाळेतील ३७ पकी १३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने या शाळेच्या अभ्यासाचा ‘पॅटर्न’ही गौरवला गेला आहे.

आपल्या यशाचे श्रेय शाळेला देताना सलोनीने अभ्यासाचा पॅटर्न उलगडून दाखवला. शाळेत विद्यार्थ्यांना दुपारचे दोन तास ‘सुपव्‍‌र्हाईज्ड स्टडी’ची सवय लावली जाते.

त्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचा अभ्यास करायची मुभा असते. त्यासाठी आवश्यक शिक्षकांचे मार्गदर्शनही तात्काळ मिळते. त्यामुळे कठीण वाटणारा गृहपाठ येथे शाळेतच करायला मिळतो. त्यात घरी एकटय़ाने अभ्यास करण्याची वेळ कमी येते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळाल्याने वेगळ्या क्लासेसचीही गरज लागत नाही, असे सलोनी सांगते.

”यंदा मी इतर कोणत्याच स्पर्धा किंवा विशेष परीक्षांमध्ये सहभागी झाले नाही. फक्त सीबीएसई परीक्षेवरच लक्ष्य केंद्रित केले. शेवटच्या दोन महिन्यांत शाळेत पाच सराव परीक्षा सोडवून घेतल्या गेल्या. यामध्ये पहिली सराव परीक्षा अर्धा अभ्यासक्रमावर आधारित होती. त्यानंतरच्या परीक्षेत अभ्यासक्रम वाढवत नेण्यात आला.

या अभ्यासाच्या जोरावर मला गणित, विज्ञान आणि मराठी विषयात पकीच्या पकी गुणांची खात्री होती. पण, परीक्षेत या तीन विषयांसह समाजशास्त्रातही पकीच्या पकी गुण मिळाले. इंग्रजी विषयात फक्त एक गुण कमी पडला. त्यामुळे मला पाचशेपकी ४९९ गुण मिळाले. या सर्व यशाचे श्रेय शाळेतील अभ्यासाच्या पद्धतीलाच द्यायला हवे”, असे सलोनीने आवर्जून नमूद केले.

महानगरे आणि ग्रामीण भागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाबाबत नेहमीच तुलना होत राहते.

पण या परिस्थितीतही शाळेने स्थानिक हुशार शिक्षकांवर विश्वास दाखवत अभ्यासाच्या योग्य पद्धतीवर अधिक भर दिला आहे.

शाळेचा अभ्यास पॅटर्न आदर्शवत

खेडच्या रोटरी स्कूलच्या अभ्यासाचा हा पॅटर्न सर्वच शाळांसाठी आदर्शवत ठरला आहे. मुळात या रोटरी स्कूलच्या माध्यमातून सात वर्षांपूर्वीपासून सीबीएसईची अभ्यासक्रमाची संधी खेडच्या विद्यार्थ्यांना मिळू लागली. यंदा या शाळेतील ३७ पकी १३ जण ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  त्यात सलोनीसह दिव्या जाडकर, सार्थक बावधनकर, साहील साप्ते, संज्योत जवंजाळ, श्रेयस पाटील, तबरेज तिसेकर या विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

* सलोनीने आता रोटरी शाळेतच बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देण्याचे ठरवले आहे.

सलोनीने यापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पियाड मुव्हमेंट, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसह अनेक स्पर्धात विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri saloni joshi come second in cbse 10th board in country