रत्नागिरी : महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कोकणाला विकासाचा सर्वाधिक निधी मिळाला पाहिजे या मागणीसह एकूण दहा मागण्यांसाठी समृद्ध कोकण संघटनेच्या स्वराज्यभूमी आंदोलन यामार्फत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जवळपास ५०० शेतकरी, आंबा बागायतदार, पर्यटन व्यावसायिक यांनी सहभाग घेतला. कुडाळ, मालवण, देवगड, दापोली, गुहागर, संगमेश्वरपासून रत्नागिरीपर्यंत जवळपास प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते आवर्जून यावेळी उपस्थित होते. धोंडू शिदे हे ८६ वर्षाचे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. संजय यादवराव, बावाशेठ साळवी – रत्नागिरी, संदीप शिरधनकर गुहागर, युयुत्सु आर्ते संगमेश्वर, संदेश साळस्कर देवरुख, जवळपास १० तरुणांनी एकावेळी उपोषण सुरू केले आहे. कोकणाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि रास्त मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
माकडांवरील नियंत्रण, आंबा बागायतदार व मच्छीमार कर्जमाफी, राज्याला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कोकण प्रदेशाला सर्वाधिक विकासाचा निधी मिळाला पाहिजे व तो योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे. यासाठी स्वायत्त कोकण समितीची स्थापना आणि दबाव गट, कोकणातल्या तरुणांना कोकणातच नोकरी मिळावी याकरता पुन्हा प्रादेशिक निवड मंडळ स्थापना, कोकण विकास प्राधिकरण प्रत्यक्ष सुरू करणे, हापूस आंबा विम्याचे पैसे तात्काळ मिळणे आणि विम्याचे निकष कोकणासाठी स्वतंत्रपणे बनवणे, विशेषतः पर्यटन आणि कोकणात व्यवसाय करण्यासाठी एक महिन्यात परवानगी मिळणे अशा प्रमुख दहा मागण्यांसाठी हे आमरण उपोषण बेमुदत सुरू करण्यात आले आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बर्गे यांची भेट घेवून त्यांना आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.