रत्नागिरी : गावात रस्त्याची वानवा, दिवसाकाठी एखादी एसटीची फेरी, मोबाइल नेटवर्क तर दुर्लभच, रोजगारासाठी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले चाकरमानी आणि गावात मनुष्यबळ नसल्यामुळे ओस पडलेली शेती, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ओझरे गाव याच दुष्टचक्रात सापडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चक्रातून बाहेर पडण्यासाठी गावतल्या शे-दीडशे शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या एकूण साडेचार हजार एकर क्षेत्रफळाच्या जमिनी चक्क एकत्रितपणे विक्रीला काढल्या आहेत.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू-नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पांसाठी जमिनी देण्यास होत असलेल्या विरोधाची उदाहरणे ताजी असताना जैतापूरपासून अडीच तासांच्या अंतरावरील ओझरे गावाने शेतजमिनी विकण्यासाठी वृत्तपत्रात रीतसर जाहिरातच दिली. या भागात कोणताही नवीन प्रकल्प येऊ घातल्याचे संकेत नाहीत. मात्र, दलाल मंडळींनी आतापर्यंत गावातल्या दीडशे-दोनशे एकर जमिनी खरेदी केल्या आहेत. ‘जिल्ह्यातील बाहेरील लोक येऊन येथे जमिनी खरेदी करतात. नंतर त्या चढ्या दराने विकतात. म्हणून आम्हीच आता एकत्रितपणे आमच्या जमिनी विकायला काढल्या,’ असे येथील एका ग्रामस्थाने सांगितले. या भागात सध्या एकराला ७० हजार रुपये खरेदीदर आहे. असे असताना गावकऱ्यांनी साडेतीन लाख रुपये एकर दर जाहीर केला आहे. ही पाचपट वाढ जमिनी विकण्यासाठी की गावाकडे लक्ष वेधण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आणि आंबा घाटाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव. गावाजवळच्या रस्त्यावरील पाटीवर ‘ओझरे’ अशी अक्षरे असली तरी, गावकरी ओझर असाच उल्लेख करतात. दीडशे ते दोनशे घरे असलेल्या ओझरेचे उत्पन्नाचे साधन शेतीच. पण जमीन मुबलक असली तरी शेतीतून चांगले उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. त्यातच गावात पुरेसे रस्ते नाहीत. दळणवळणाची सुविधा म्हणजे दिवसातून एखादी फेरी मारणारी एसटी. मोबाइलचे नेटवर्कही शोधावे लागते. शैक्षणिक सोयीही शाळेपर्यंतच. त्यामुळे गावातील घरटी किमान एक माणूस रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे स्थायिक झालेला. या ‘चाकरमान्यां’ची गजबज केवळ शिमगा, गणपती आणि दिवाळीपुरतीच. कर्ती मंडळी शहरात गेल्यामुळे शेती कुणी करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेती विकलेली बरी, या निर्णयाप्रत गावकरी आले आहेत. विकणाऱ्यांमध्ये शहरात स्थायिक झालेली मंडळीही आहेत.

डोंगर उतारावरची जमीन

गावकऱ्यांची ही साडेचार हजार एकर जमीन डोंगर माथ्यावर आणि उतारावर आहे. या जमिनी कसणेही आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात डोंगर उतारावरून पाण्यासोबत माती आणि मातीसोबत शेती वाहून जाण्याची भीती. फळबागा लावायच्या तर त्यासाठी आठ दहा वर्षे कसून मेहनत करायला हवी. ती करायला माणसे नाहीत. गावातील तरुण पिढी शेती करायला उत्सुक नाही. त्यामुळे ही जमीन विक्रीस काढल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

ओझरे गाव खूपच सुंदर आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये. त्या जमिनीतून उत्पन्न घेऊन आपला आर्थिक विकास केला तर गावचा विकास होईल. गावाबाहेर पडलेले लोक पुन्हा गावाकडे वळतील. – सचिन साखरपेकर, पर्यावरणप्रेमी.