चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून माय लेकरासह आत्याचा मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खडपोली रामवाडी येथील लता शशिकांत कदम ( वय ३५), लक्ष्मण शशिकांत कदम ( वय ८ ), रेणुका धोंडीराम शिंदे ( वय ४५)  तिघेही जण खडपोली रामवाडी येथील डोहात कपडे धुण्यासाठी गेले होते.

यावेळी लक्ष्मण शशिकांत कदम हा पाण्यात खेळत होता. काही वेळाने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याची आई लता शशिकांत कदम हिने पाहिले, आणि त्याला वाचविण्यासाठी तिने उडी मारली. मात्र तीही बुडत होती. त्यामुळे माय लेकरांना वाचवण्यासाठी मुलाची आत्या रेणुका धोंडीराम शिंदे यांनी पाण्यात उडी मारली आणि तिघेही डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण ज्या ठिकाणी पाण्यात खेळत होता, त्या ठिकाणी पाणी कमी होते. परंतु नंतर तो जास्त पाणी असलेल्या ठिकाणी गेला तेथे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही म्हणून तो बुडाला. नंतर त्याची आई आणि आत्या बुडाली. या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. घटनेची माहिती अलोरे शिरगाव पोलीस यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यावर दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविचेदन करून त्यांचे मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.