राजगोपाल मयेकर, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दापोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थीचे इकेव्हायसीह्ण अर्थात आधारकार्ड लिंक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामगिरीमध्ये रत्नागिरी तालुका अव्वल ठरला असून दापोली तालुका पिछाडीवर आहे. जिल्ह्याला अनोळखी असलेल्या लाभार्थीची संख्या ५० हजार ५५ असून रत्नागिरी तालुक्याने या यादीतील ३३ हजार ९५८ तर संगमेश्वरने १० हजार २१७ नावे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  रत्नागिरीने २९ हजार ६४१ लाभार्थीपैकी २३ हजार ७२५ लाभार्थीचे इकेव्हायसी करून ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याखालोखाल गुहागर १६ हजार ३३६ आणि मंडणगडने ४ हजार ७५९ लाभार्थीचे आधार लिंक करत ७६ टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे.

चिपळूण ७४ टक्के तर राजापूर ७१ टक्क्यांपर्यंत पोचला असून त्यांनी अनुक्रमे २१ हजार ४ आणि १४ हजार २२६  लाभार्थीपर्यंत पोचण्यात यश मिळवले आहे. संगमेश्वर, लांजा आणि खेडने साठ टक्क्यांवर कामगिरी केली आहे. यामध्ये संगमेश्वर ६७ टक्क्यांसह २२ हजार ९२९, लांजा ६३ टक्क्यांसह १० हजार ५५६, तर खेड तालुका ६० टक्क्यांसह ११ हजार ८१३ लोकांपर्यंत पोचला आहे. सर्वात शेवटी असलेला दापोली तालुक्याने ५७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून येथील १६ हजार ३९३ लाभार्थीचे इकेव्हायसी पूर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्यातील दोन लाख चार हजार ७४१ लाभार्थीपैकी ६९ टक्के आधार जोडणीचे काम पूर्ण झाले असून ६२ हजार ७१३ जोडणी अजून शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनोळखी लाभार्थीची नावे शोधून ती रद्द करण्याचा उद्देशही मोहिमेतून साधला जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण ५० हजार ५५५ नावे अपात्र  असल्याचे उघड झाले आहे. तसेच मृत स्थानिक लाभार्थीची नावेही शोधण्यात येत आहे. अनोळखी लाभार्थी नोंदीवरून रत्नागिरी आणि संगमेश्वरनंतर दापोली तालुक्यात दोन हजार ६८९ नावं अपात्र ठरणार आहेत. इतर सर्व तालुक्यांत अशा लाभार्थीची नोंद एक हजारांपेक्षा कमी आहे, असे एका अधिकृत आकडेवारीवरून स्प्ष्ट झाले आहे. ही इकेव्हायसी झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील ग्रामसेवक, कृषी साहाय्यक आणि तलाठय़ांसह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना शंभर टक्के इकेव्हायसी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri tops in aadhaar link with pm kisan samman nidhi yojana zws