ढोल-ताशा पथक, शाळकरी मुलांचे चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला आणि मान्यवरांच्या उपस्थितीत निघालेल्या शानदार शोभायात्रेने रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सवाचा शनिवारी येथे प्रारंभ झाला.
येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि भाटय़े समुद्रकिनाऱ्यावर आयोजित या महोत्सवातील वाळूशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. त्यापाठोपाठ रत्नदुर्ग माऊंटेनीअर्सच्या वतीने आयोजित रॅपलिंग या साहसी खेळांचेही झरी विनायक मंदिराजवळ पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी उद्घाटन केले. त्यानंतर संध्याकाळी मारुती मंदिरापासून गोगटे महाविद्यालयापर्यंत शानदार शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये घोडय़ावर स्वार छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी नेत्यांची वेशभूषा केलेली शाळकरी मुलांचे चित्ररथ, बँड व कवायत पथके इत्यादींचा समावेश होता. मेस्त्री हायस्कूल, शिर्के हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, फाटक हायस्कूल इत्यादी शाळांचा त्यामध्ये सहभाग होता. त्याचबरोबर ढोल-ताशा पथक आणि पालखीही होती. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू महाडिक इत्यादी मान्यवर शोभायात्रेच्या अग्रभागी चालत कार्यक्रम स्थळापर्यंत गेले. संध्याकाळी उशिरा गोगटे महाविद्यालयाच्या प्रांगणात महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. पालकमंत्री वायकर आणि लोकप्रतिनिधींबरोबरच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार इत्यादी ज्येष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान रविवारी (३ मे) सकाळी ९ वाजता भाटय़े समुद्रकिनाऱ्यावर नौकानयन स्पर्धा होणार असून दुपारी ४ वाजता सावरकर नाटय़गृहात मॅजिक-जगलरी-पपेट शो आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ६ वाजता गोगटे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असून रात्री ८ वाजता ‘हास्यरंग’ या विनोदी कार्यक्रमात अंशुमन विचारे, अतुल तोडणकर, अरुण कदम, कमलाकर सातपुते, गायक प्रथमेश लघाटे, शमिका भिडे इत्यादी कलाकार सहभागी होणार आहेत.
महोत्सवानिमित्त गोगटे महाविद्यालय आणि भाटय़े समुद्रकिनाऱ्यावर बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी (४ मे) महोत्सवाची सांगता होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा