चिपळूण – कोकण रेल्वे कारभाराच्या हलगर्जीपणामुळे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. चिपळूणजवळच असलेल्या कळंबस्ते फाटा येथे फाटक न पडल्याने गोव्याकडून मुंबईकडे रवाना होणारी वंदे भारत एक्स्प्रेस खेर्डी पुलावरच थांबवण्यात आली. ही गाडी हळूहळू हॉर्न देत कळंबस्ते फाटकापर्यंत आणून पुढे मार्गस्थ करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिपळूण रेल्वे स्थानकाच्या आधी कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. येथून मोठ्या प्रमाणात वाहनाची ये जा होत असते. या ठिकाणी असलेल्या फाटकाच्या यंत्रणेत पंधरा दिवसाने पुन्हा एकदा बिघाड होवून फाटक न पडल्याने वंदे भारत एक्सप्रेस खेर्डी पुलावरच थांबवावी लागली. मागील पंधरा दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने कोकण रेल्वेच्या कारभाराविरोधात नागरिक व वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. सुदैवाने यामार्गावरील दुसऱ्या वेळीही होणारा मोठा अनर्थ टळला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर भरवस्तीत असलेल्या कळंबस्ते येथील रेल्वे फाटकाला उड्डाण पूल बांधावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. जेणे करुन या ठिकाणी मोठा अपघात होणार नाही. तसेच पंधरागावाकडे जाणाऱ्या लोकांना या उड्डाण पुलावरून वाहतूक करण्यास सोपी जाईल. या उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षे करण्यात येत आहे. याची कोकण रेल्वेने तरतूद देखील केली आहे. मात्र राज्य शासनानेही यासाठी तरतूद करणे गरजेचे आहे.

रेल्वे येण्याच्या वेळेत या ठिकाणी फाटक न पडल्यास नागरिकांची तारांबळ उडते. कळंबस्ते फाटकाजवळ फाटक न पडण्याचा प्रकार पुन्हा घडल्याने वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरीहून मुंबईकडे जात असता खेर्डी पुलावर थांबवण्याची वेळ आली. अत्यंत हळूहळू कळंबस्ते रेल्वे फाटकापर्यंत हॉर्न वाजवत नेण्यात आली. त्यांनतर ती मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने वंदे भारत एक्स्प्रेस थांबवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.