नाशिक येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनस्थळी शाई फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं ही शाईफेक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेवर आता राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“अशाप्रकारे साहित्यसंमेलनात जाऊन शाईफेक करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. साहित्यसंमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असतं आणि समजा तुम्हाला दुसरी अभिव्यक्ती करायची असेल, तर तुम्हाला कुठेही करता येते. पण अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायाची आणि शाईफेक करायची हे योग्य नाही.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
तर, या प्रकाराचा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो. गिरीश कुबेर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकसत्तासारख्या दैनिकाचे संपादक आहेत. त्यांनी जे काही लिखाण केलं असेल किंवा करत आहेत त्यावर मतभेद असू शकतात. पण मुळात त्यांनी काय लिहिलंय, हे किती लोकांनी वाचलंय? न वाचता अशा पद्धतीने मराठी साहित्य संमेलन सुरू असताना त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणं हे कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी जे काही लिहिलं आहे, त्यासंदर्भात काही लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत खरं-खोटं होईलच. पण साहित्य संमेलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ असतं. तिथे एका संघटनेचे काही लोक येतात आणि त्यांच्यावर शाई फेकतात, धक्काबुक्की करतात. वीर सावरकरांच्या भूमीत, कुसुमाग्रजांच्या भूमीत असं करून संभाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील त्यांनी डागाळलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्रा’ या पुस्तकातील काही भागावर आक्षेप असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडकडून घेण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ही शाईफेक करण्यात आल्याचं समोर येत आहे.
समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी दुसरी दिशा दाखवली पाहिजे : गिरीश कुबेर
दरम्यान, या प्रकारानंतर गिरीश कुबेर परिसंवादाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मंचावरून भाषण करताना माध्यमांच्या भूमिकेविषयी सविस्तर म्हणणं मांडलं. गिरीश कुबेर म्हणाले, “माध्यमं हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे माध्यमांचं मनोरंजीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजीकरण झालंय. समाजात वैचारिकतेचा अभाव असेल तर तो माध्यमांमध्येही तसाच दिसेल. त्याचवेळी माध्यमांची खरी जबाबदारी असते ती अशा समाजाला वैचारिकतेकडे नेणं. माध्यमांमध्ये का यायचं याबाबत माझे संपादक गोविंद तळवलकर यांनी भूमिका सांगून ठेवली होती. तसं करण्याचीच माझी आस होती. समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी मध्ये उभं राहून दुसरी दिशा दाखवली पाहिजे. आता उलटं झालं आहे. समाज एका दिशेने जात असेल तर माध्यमं देखील त्याच दिशेने जातात. माध्यमं आधी पुढे पळतात की समाज पुढे पळतो अशा प्रकारचं सध्या चित्र आहे. हा माध्यमांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे.”