मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अन्य देशांच्या मदतीने काही तस्करी टोळ्या रेव्ह पाटर्याचे आयोजन करून तरुणांना व्यसनाधीन बनवत आहेत. या रेव्ह पाटर्य़ाच्या माध्यमातून तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. हे टाळण्यासाठी रेव्ह पाटर्य़ावर र्निबध आणणारे सर्वसमावेशक धोरण लवकरच जाहीर केले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत केली.
नागपूरमधील कॅरेमल लाऊंज हॉटेलवर अलीकडेच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रेव्ह पार्टीत सामील झालेल्या १२९ मुलांना अटक करण्यात आली होती. त्याबाबत संजय रायमुलकर,अनिल गोटे आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यावर या हॉटेलचा परवाना येत्या २४ तासात रद्द करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. राज्यात अलीकडील काळात रेव्ह पाटर्याच्या आयोजनच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. या रेव्ह पाटर्य़ावर र्निबध आणण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
दारूच्या पैशातून राज्य चालविण्याची ही कसली आदर्श संस्कृती, असा सवाल करीत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात दारूबंदी करण्याची मागणी केली. हॉटेल अथवा रिसॉर्टमध्ये रेव्ह पाटर्य़ा होऊ नयेत यासाठी तर दोन तासांनी सर्व हॉटेल्स चेक करून अशा पाटर्य़ा पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी करण्याबाबतचा निर्णय लवकच घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. नागपूर शहरात मंजूर झालेली पाच पोलीस ठाणी लवकरच सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader