आजपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाला आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही नागपूरला गेले आहेत. ठाकरे पिता-पूत्र विदर्भाच्या धर्तीवर पोहोचल्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरे यांचं नाव ‘बापू’ आहे, तर आदित्य ठाकरे यांचं नाव ‘पप्पू’ आहे. त्यांनी अधिवेशनाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पडू द्यावं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये, राजकारण करू नये, अशी टीका रवी राणांनी केली. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ जारी करत टीकास्त्र सोडलं आहे.
संबंधित व्हिडीओत रवी राणा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी विदर्भात अधिवेशन आयोजित केलं. या अधिवेशनात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हजर राहत आहेत. खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचं नाव ‘बापू’ आहे. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे म्हणजे ‘पप्पू’ आहे. हे दोघंही विदर्भाच्या धर्तीवर अधिवेशनासाठी येत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, अधिवेशन पूर्णपणे व्यवस्थित चालू द्यावं. कुठल्याप्रकारचा गोंधळ करू नये. तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतर तुम्ही जे करू शकले नाहीत, ते खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस करत आहेत,” अशी टीका रवी राणांनी केली.
हेही वाचा- “ज्याच्या मेंदूमध्ये शेण भरलंय, त्या व्यक्तीला…”, अमोल मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर खोचक टीका!
सुनील प्रभूंवर टीका करताना रवी राणा पुढे म्हणाले, “आज सुनील प्रभू सभागृहात बोलले की, मंत्रिमंडळासाठी बांधलेल्या बंगल्यांची साफ-सफाई करण्यासाठी मोठा खर्च केला. अरे तुम्ही कधी विदर्भात अधिवेशन घेतलं नाही. तुमचे मंत्री कधी इकडे आले नाहीत. तुम्ही कधी त्या बंगल्यांमध्ये थांबले नाहीत. तुमची अडीच वर्षाची धूळ साफ करणं गरजेची होती, म्हणून सगळे बंगले स्वच्छ केले. आता याठिकाणी अनेक मंत्री थांबून विदर्भातील जनतेला न्याय देण्याचं काम करत आहेत,” असा टोला रवी राणांनी लगावला.