अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी अलीकडेच बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटले, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद पेटला आहे. या प्रकरणी बच्चू कडूंनी राजापेठ पोलीस ठाण्यात रवी राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राजापेठ पोलिसांनी राणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या घडामोडीनंतर रवी राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे आपलं सरकार आहे. त्यांनी दिलेल्या आदेशाचं मी पालन करणार आहे. पण माझ्यावर कुणी खालच्या भाषेत टीका केली किंवा शिवीगाळ केली, तर मी त्या लोकांना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संबंधित वादावर भाष्य करताना रवी राणा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्या आदेशाचं मी नक्की पालन करेन. पण मला असं वाटतं की, मी जे बोललो तेच सत्य आहे, असं जर कुणी समजत असेल. खालच्या भाषेत शिवीगाळ करून स्वत:ला सत्यवादी समजणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा की, तुम्ही जे बोलता ते हजारो लोकं ऐकतात, ते लोकं येणाऱ्या काळात तुम्हाला धडा शिकवतील.”
“माझ्याविरोधात कुणी खालच्या भाषेत टीका केली किंवा शिवीगाळ केली, तर या लोकांना मी सोडणार नाही. स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना लोकं धडा शिकवतील. माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना मी लवकरच उत्तर देईन” असंही आमदार रवी राणा म्हणाले.