अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होत असताना बच्चू कडू आणि महायुतीमधील संघर्ष विकोपाला गेला. भाजपाने नवनीत राणा यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनीही प्रहार जनशक्तीतर्फे दिनेश बुब यांना मैदानात उतरविले. तर महाविकास आघाडीतर्फे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपाने अमरावतीमध्ये विजय मिळवण्यासाठी कंबर कसली असून अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा येथे झालेल्या आहेत. आता मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी म्हणजेच २४ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही सभा होणार आहे. त्यावरून बच्चू कडू आणि रवी राणा आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पोलिसच भाजपाचे कार्यकर्ते, आता आम्ही विष प्यावे का?’ बच्चू कडू यांचा उद्विग्न सवाल

अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी सभा घेण्यास निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली होती. मात्र २४ एप्रिल रोजी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह याच मैदानावर प्रचार सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना आज मैदानाचा ताबा घेण्यासापासून पोलिसांनी मज्जाव केला. आपल्याकडे रितसर परवानगी असूनही पोलीस आपली अडवणूक करत असल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन करत पोलीस भाजपाधार्जिण निर्णय घेत असल्याचा आरोप केला. बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्वाभिमानी युवा पक्षाचे नेते आणि नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी टीका केली आहे.

अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या

काय म्हणाले रवी राणा?

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना रवी राणा म्हणाले, “बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्यासाठी नौटंकी करत आहेत. या नौटंकीबाजाला महाराष्ट्राची जनता चांगली ओळखून आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अमरावतीमध्ये येत आहेत. अमित शाह यांनी अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांड उघड करण्यासाठी प्रयत्न केले होते. तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन मंत्री बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांनी हे हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला होता. उमेश कोल्हे यांच्या प्रकरणाला घरोफोडीच्या प्रकरणात बदलण्यात आले होते. मात्र अमित शाह यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणात न्याय मिळाला. त्या अमित शाह यांना बच्चू कडू विरोध करत आहेत, हे दुर्दैवी आहे.”

महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होत असतील तर निवडणूक आयोगाकडून त्या त्या वेळी निर्णय घेतले जात असतात. उद्या अचलपूर येथे आमची सभा होती. मात्र तिथे राहुल गांधी येणार असल्यामुळे माझी सभा रद्द करण्यात आली. काल सांस्कृतिक भवन आमच्या नावाने घेण्यात आले होते. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार असल्यामुळे ऐनवेळी आम्हाला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. मोठे नेते येणार असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही बदल केले जात असतात. प्रशासन त्याचा निर्णय घेत असते. बच्चू कडू यांनी परवानगी मागण्याआधीच आम्ही २१ ते २४ एप्रिल या तारखांमध्ये आमची सभा होऊ शकते, असे निवडणूक आयोगाला कळविले असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana slams bachhu kadu over union home minister amit shah amravati rally kvg
Show comments