मागील काही दिवसांपासून राज्यात आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात ‘खोक्यां’वरून वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केली होती. त्यानंतरही रवी राणांनी ‘घरा घुसून मारेन’ चे वक्तव्य केलं होतं. पण, आता बच्चू कडू यांनी मवाळ भूमिका घेत ‘हा वाद पेटवायचा नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील २० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, अशा प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी बच्चू कडू मुंबईत आले होते. त्याआधी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पण, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी बच्चू कडू यांची सहकाऱ्याबरोबर सुरु असलेली कुजबूज कॅमेरात कैद झाली आहे. यात, रवी राणांच्या वक्तव्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
एक व्यक्ती ‘काय ऐकतोय काय झालं अजून?,’ असं बच्चू कडूंना विचारत आहे. त्यावर “ते गोंधळलेले आहेत. 3 तारखेला तीन वाजता वाद मिटला सांगितलं. सहा वाजता घरात घुसून मारू आणि आज म्हणतयं वाद नाही राहिला. डोक्यावर परिणामं झालाय वाटतं. ते म्हणतयं देवेंद्रजी सांगत आहे, तेच बोलतोय,” असं बच्चू कडू म्हणाले. यानंतर एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने त्यांना माईक सुरु असल्याचं म्हटलं. दोघंजण एक सावध झाले आणि चर्चा थांबवली. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
“आम्ही दोघे भेटून एकाच पंगतीत जेवायला बसू”
दरम्यान, वाद आणखी वाढवायच नाही, असं बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “रवी राणा आणि नवनीत राणा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही म्हणायचं का की त्यांनी पैसे घेतले? हा वाद आणखी पेटवायचा नाही. माध्यमं वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी पेटवणार नाही. आज रात्रीच राणांना भेटणार, त्यावेळी माध्यमांनाही बोलावणार आहे. आम्ही दोघे भेटून एकाच पंगतीत जेवायला बसू,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.